अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील माळीवाडा परिसरात मार्केटयार्ड रस्त्यावर एकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, गोळी कोणी कोणावर झाडली, ज्याच्यावर संशय आहे, तो कोणाच्या सांगण्यावरून आला होता, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. प्राथमिक माहितीनुसार एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, तपासात वेगळीच माहिती समोर येत असल्याने उशिरापर्यंत याचा तपास सुरू होता.
मार्केटयार्ड रस्त्यावरील एका पेट शॉपमध्ये एक डॉक्टर व आणखी दोघे जण त्यांच्यातील जुन्या वादाच्या सुनावणीबाबत चर्चा करत असताना बाहेरून दुकानात आलेल्या व्यक्तीने गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, दुकानात चर्चा करणार्यांपैकी ज्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे, त्यानेच संशयित व्यक्तीला बोलावले होते, असे समोर येत आहे. त्यामुळे गोळीबार नेमकी कोणावर व कोणत्या कारणाने करण्यात आला, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू होता.
दरम्यान, गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकास ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.