अहमदनगर | प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम 8 नुसार दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. पोपट म्हातारदेव फुंदे (वय 50 रा. आल्हनवाडी, ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.
16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलगी त्यांची शेळी कोठे गेली आहे पाहण्यासाठी संत्राच्या बागेकडे गेली असता तिथे गेल्यानंतर पोपट फुंदे याने तिला मोबाईल मध्ये गेम खेळण्यासाठी दिला. ती मोबाईलवर गेम खेळत असताना पोपट याने तिला बळजबरीने खाली झोपायला लावले व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एका व्यक्तीने सदरची घटना पाहून मोठमोठ्याने आवाज दिले. त्यामुळे पोपट त्या ठिकाणावरून पळून गेला. घटनेनंतर पीडित मुलीने व सदर व्यक्तीने संपूर्ण घटना ही आईला सांगितली.
आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोपट फुंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण बी. पाटील यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच मुलीची आई, पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात पाथर्डी नगरपरिषदेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार अडसुळ, अरविंद भिंगारदिवे यांनी सहकार्य केले.
पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी 12 वर्षांची होती. कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केली असून त्याला निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.