Saturday, July 27, 2024
Homeनगरझेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका

अहमदनगर | प्रतिनिधी

झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या 19 गोवंशीय जनावरांची सुटका केली. दोन लाख 25 हजाराचे जनावरे, दोन टेम्पो, एक पिकअप असा 15 लाख 75 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सात जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

असद गफुर शेख (वय 36 रा. वाळकी ता. नगर), मजर महंमद हनिफ कुरेशी (वय 36), सिध्दीक असिफ कुरेशी (वय 22), शहाजान अब्दुल कलीम कुरेशी, आयनुर रफिक कुरेशी (वय 34, सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट), नासिर बाबु कुरेशी (वय 45 रा. कसाई गल्ली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तसेच मुश्ताक हाजी इब्राहिम कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट येथील व्यापरी मोहल्ला परिसरात एका कत्तलखान्यावर मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे आणली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहा.फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस अंमलदार सचिन आडबल, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

पथकाने पंचासमक्ष व्यापारी मोहल्ला परिसरात छापा टाकला असता दोन टेम्पो व एक पिकअपमध्ये 19 गोवंशीय जनावरे मिळून आली. ती सर्व जनावरे कत्तलीसाठी येथे आणली असल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी टेम्पो, पिकअप, जनावरांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अंमलदार रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

पकडलेले सहा जण सराईत गुन्हेगार

कत्तलीसाठी जनावरे घेऊन आलेल्या सहा जणांविषयी अधिक माहिती घेतली असता ते सर्व सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आयनुर कुरेशी विरोधात तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात तीन तर नासिर कुरेशी, शहाजहान कुरेशी, मुश्ताक कुरेशी यांच्या विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. असद शेख विरोधात आष्टी (जि. बीड) पोलीस ठाण्यात एक व मजहर शेख विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या