अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी मंगळवार (दि.6) रोजी नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. यात जिल्ह्यात 36 लाख 73 हजार 969 मतदार असून यात 19 लाख 4 हजार 49 पुरूष तर 17 लाख 69 हजार 720 महिला मतदार तर 200 इतर मतदारांचा समावेश आहे.
प्रसिध्द झालेल्या मतदार यादीवर विधानसभा मतदारसंघनिहाय दावे- हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर या मतदारसंघात मतदान केंद्रनिहाय नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. दरम्यान, काल जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत सर्वाधिक मतदार हे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात 3 लाख 63 हजार 88 असून त्या खालोखाल पारनेर मतदारसंघात 3 लाख 42 हजार 562 आहेत. तर सर्वात कमी मतदार हे अकोले मतदारसंघात 2 लाख 59 हजार 765 असून नेवासा तालुक्यात 2 लाख 75 हजार 436 मतदार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी प्रसिध्द केल्यानंतर मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, 10 ऑगस्टपर्यंत नव मतदारांना अर्जनंबर 6 भरून 18 वर्षे पूर्ण होणार्यांना मतनोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.
तसेच त्यानंतर 20 तारखेपर्यंत मतदार यादीवरील दावे आणि हरकती स्विकारता येणार असून मतदार नोंदणीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालिमठ यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात मतदार यादी पुन:परिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी राजकीय पक्षांच्या सहभाग महत्वाचा असून राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधी मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) म्हणून नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सालिमठ यांनी केले आहे. नगर जिल्ह्यात मतदानाच्या वेळी गर्दी होवू नयेत, मतदानात आणखी सुसूत्रता यावी, यासाठी 34 ठिकाणी नव्याने मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पूर्वी 3 हजार 731 मतदान केंद्र होती त्यात आता वाढ होवून 3 हजार 763 मतदान केंद्र होणार आहेत.
असे आहेत मतदार
अकोले 1 लाख 36 हजार 397 पुरूष आणि 1 लाख 23 हजार 367 महिला एकूण 2 लाख 59 हजार 765 मतदार. संगमनेर 1 लाख 45 हजार 270 पुरूष आणि 1 लाख 35 हजार 777 महिला एकूण 2 लाख 81 हजार 47 मतदार. राहाता 1 लाख 44 हजार 233 पुरूष आणि 1 लाख 36 हजार 112 महिला एकूण 2 लाख 80 हजार 352 मतदार. कोपरगाव 1 लाख 42 हजार 901 पुरूष आणि 1 लाख 38 हजार 440 महिला एकूण 2 लाख 81 हजार 347 मतदार. श्रीरामपूर 1 लाख 53 हजार 643 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 401 महिला एकूण 3 लाख 3 हजार 104. नेवासा 1 लाख 43 हजार 494 पुरूष आणि 1 लाख 31 हजार 937 महिला एकूण 2 लाख 75 हजार 436 मतदार. शेवगाव-पाथर्डी 1 लाख 90 हजार 302 पुरूष आणि 1 लाख 72 हजार 781 महिला एकूण 3 लाख 63 हजार 88 मतदार. राहुरी 1 लाख 63 हजार 669 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 560 महिला एकूण 3 लाख 13 हजार 230 मतदार. पारनेर 1 लाख 77 हजार 509 पुरूष आणि 1 लाख 65 हजार 50 एकूण 3 लाख 42 हजार 562 मतदार. नगर शहर 1 लाख 56 हजार 31 पुरूष आणि 1 लाख 49 हजार 238 महिला एकूण 3 लाख 5 हजार 376 मतदार. श्रीगोंदा 1 लाख 72 हजार 879 पुरूष आणि 1 लाख 57 हजार 792 महिला एकूण 3 लाख 30 हजार 674 मतदार. कर्जत-जामखेड 1 लाख 77 हजार 721 पुरूष आणि 1 लाख 60 हजार 265 महिला एकूण 3 लाख 37 हजार 789 मतदार आहेत.