Monday, September 30, 2024
Homeनगरपाच तालुक्यांत सरासरीच्या 150 टक्क्यांहून अधिक पाऊस

पाच तालुक्यांत सरासरीच्या 150 टक्क्यांहून अधिक पाऊस

यंदा रब्बी हंगामासाठी आशादायक चित्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात यंदा जून ते सप्टेंबरअखेर पडणार्‍या पावसाच्या सरासरीत पाच तालुक्यात 150 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. यात सर्वात आघाडीवर श्रीगोंदा तालुका असून याठिकाणी सरासरीच्या 171 टक्के पाऊस झालेला आहे. तर पाथर्डी दुसर्‍यास्थानावर असून 169 टक्के, पारनेर तिसर्‍या स्थानावर असून याठिकाणी 166 टक्के, अकोले 159 टक्के पाऊस झाला असून पाचव्यास्थानावर शेवगाव तालुका असून याठिकाणी 152.6 टक्के पाऊस झाला आहे.

- Advertisement -

यंदा नगर जिल्ह्यात जूनच्या सुरूवातीपासून चांगल्या पावसाला सुरूवात झाली असून विशेष करून नगर दक्षिणेत हे प्रमाण चांगले आहे. त्या तुलनेत नगर उत्तरेतील अनेक तालुक्यात यंदा पावसाचा जोर काहीसा कमी दिसला. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस हा श्रीरामपूर तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के तर राहाता तालुक्यात सरासरीच्या 112 आणि नेवासा तालुक्यात सरासरीच्या 115.6 टक्के झालेला आहे. त्या तुलनेत महिनाभरापूर्वीच दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडलेली आहे. यंदा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झालेला असल्याने त्यांचा चांगला परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर दिसणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी साडेचार लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून जिल्ह्यात जन्माश्रष्ठीपासून ज्वारीच्या पेरण्यांना सुरूवात होत असते. मात्र, यंदा या काळात पावसाचा जोर टिकून असल्याने विशेष करून दक्षिण जिल्ह्यात तो अधिक असल्याने ज्वारीच्या पेरण्या सुरू होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. दमदार पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 90 हजार प्रस्तावित करण्यात आले असून गव्हाचे क्षेत्र देखील 1 लाख 22 हजार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मका, हरभरा, कांदा ही पिके वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात पाच तालुक्यात सरासरीच्या 150 ते 171 टक्के पाऊस झालेला आहे. नगर जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबरअखेर सरासरी 448 मि.मी. पाऊस पडत असतो. यंदा तो 629.2 मि.मी झालेला आहे. त्याची जिल्ह्याची सरासरी ही 140. 4 टक्के असून मागील वर्षी तो 88.7 टक्के होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट पाऊस झालेला आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यात खरीप हंगामातील पिकांना फटका बसलेला आहे. काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झालेले आहे.

जून ते सप्टेंबर दरम्यान झालेला पाऊस
नगर 688.1 मि.मी (143.4 टक्के), पारनेर 687.6 मि.मी (166 टक्के), श्रीगोंदा 688.8 मि.मी (170.9 टक्के), कर्जत 668. 3 मि.मी (149.4 टक्के), जामखेड 762.6 मि. मी (132. 4 टक्के), शेवगाव 706.8 मि.मी (152.6 टक्के), पाथर्डी 799. 7 मि.मी (169 टक्के), नेवासा 496.8 मि.मी (115. 6 टक्के), राहुरी 508. 8 मि.मी (117.8 टक्के), संगमनेर 492 मि. मी (140.1 टक्के), अकोले 777.2 मि.मी (159.1 टक्के), कोपरगाव 515.9 मि.मी (127.6 टक्के), श्रीरामपूर 462.9 मि.मी (100 टक्के), राहाता 509. 4 मि.मी. (112.2 टक्के) असा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या