Saturday, July 27, 2024
Homeनगरजिल्ह्यात 18 मंडळात दमदार पाऊस

जिल्ह्यात 18 मंडळात दमदार पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हावासीयांवर गणपती बाप्पांची कृपादृष्टी कायम असून रविवारी सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यात 18 मंडळात दमदार पावसाची नोंद झाली आहे. यात राहुरीमध्ये सर्वाधिक 65 मि.मी.पाऊस झाला असून पावसासाठी सर्वात पिछाडीवर असणार्‍या पारनेर तालुक्याने पावसाची तुट भरून काढली आहे. तीन दिवसात पारनेर तालुक्याची पावसाची सरासरी 40 टक्क्यांनी वाढत जिल्ह्यात सर्वाधिक 96 टक्के झाली आहे. यामुळे लवकरच पारनेर तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना सुरूवात करता येणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मागील आठवड्यात गुरूवार (दि.21) रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली. यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील पिकाला जीवनदायी ठरला आहे. यासह रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्‍यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात दमदार पाऊस पडत आहे. विशेष करून दक्षिणेतील पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असून उत्तरेतील श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि संगमनेर पावसाचा जोर काहीसा कमी आहे. यामुळे तालुकानिहाय पावसाच्या सरासरीत हे तालुके पिछाडीवर आहेत. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस झालेला आहे.

रविवारी राहुरी महसूल मंडळात 65 मि.मी. पाऊस झाला असून उर्वरित मंडळात चास (नगर), पारनेर, भाळवणी, टाकळीढोकेश्वर (पारनेर), श्रीगोंदा, पेडगाव (श्रीगोंदा), माहिजळगाव (कर्जत), खर्डा (जामखेड), बोधेगाव, चापडगाव, ढोरजगाव (शेवगाव), माणिकदौंडी, कोरडगाव, मिरी (पाथर्डी), नेवासा बु (नेवासा), देवळाली प्रवरा, टाकळीमियाँ (राहुरी) याठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली आहे.

सीना निम्मे भरण्याच्या मार्गावर

कर्जत तालुक्यात पाऊस झाल्याने सीना धरणातील पाणीसाठा 1072 दलघफू (45 टक्के) गेला आहे. पाऊस नसल्याने या धरणातील पाण्याने तळ गाठला होता. पण तीन दिवसांच्या पावसाने धरणात नव्याने पाण्याची आवक झाली आहे.

जिल्ह्याची सरासरी 78 टक्के

गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाची सरासरी वाढत आहे. मागील जिल्ह्यातील पावसाची सरासरी 52 टक्के होती. त्यात चार दिवसांत मोठी वाढ होत रविवारअखरे पावसाची सरासरी 77.8 टक्के झाली आहे. यात सर्वाधिक पारनेर तालुका 96, नगर 92, शेवगाव आणि अकोले प्रत्येकी 90 टक्के असे आहे. तर सर्वात पावसाची सरासरी टक्केवारी 42, राहुरी 57 टक्के, राहाता 58, कोपरगाव 64, संगमनेर 66 अशी आहे. जिल्ह्यात पाच तालुक्याची टक्केवारी ही 90 टक्क्यांच्या पुढे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या