Wednesday, May 29, 2024
Homeनगरजिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळीचा तडाखा

जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळीचा तडाखा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवार पाठोपाठ सोमवारीही ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात नगर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. कांद्याचे भाव कोसळलेले असतानाच, अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू आणि हरभरा पिक धोक्यात आले आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे.या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर, राहुरीत अवकाळी दणका

श्रीरामपूर, वळण |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व परिसरात काल सोमवारी दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढविली आहे. उक्कलगाव, बेलापूर व अन्य भागातही अवकाळी पावसाने तडाखा दिला.त्यामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. चिंच, आंबा पिकालाही फटका बसला आहे. राहुरीच्या पूर्वभागातील वळण, वळणपिंप्री, पाथरे खुर्द, मांजरी भागात रात्री 9 ते 10 या कालावधीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, खरबूज, तरबूज आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

चांदा परिसरात गारा, गहू, हरभरा जमिनदोस्त

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा, बर्‍हाणपूर परिसरात अवकाळीचा जोरदार तडाखा बसला असून चांद्याच्या काही भागात गाराही पडल्या तर भालके वस्तीवर नारळाच्या झाडावर वीज कोसळली. काल सायंकाळी सातच्या दरम्यान जोरदार वादळी वार्‍यासह अचानक अवकाळी पाऊस या परिसरात सुरू झाला.

विजांचा कडकडाट होता. काही ठिकाणी गाराही पडल्या तर चांदा लोहारवाडी रोडवर भालके वस्ती येथील संजय अण्णासाहेब भालके याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली. नारळाने पेट घेतला होता या पावसाने या परिसरात शेतकर्‍याचे प्रंचड नुकसान झाले असून काढणीस आलेला गहू हरभरासह कांदा आणि इतर नकदीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पारनेरच्या उत्तरभागात गारपीट

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये सोमवारी (दि.6) सायंकाळी अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतमालाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील कान्हुरपठार, किन्ही, बहिरोबावाडी यासह इतर शेजारील गावांमध्ये सोमवारी सायंकाळी गारपीट झाली. यात कांदा, ज्वारी, हरभरा, गहू या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत आहे. अनेक ठिकाणी गहू पिक भूईसपाट झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या