पारनेर । तालुका प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या बस नगर विभागाच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित असल्याचा विश्वास एसटीच्या नगर विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी व्यक्त केला.
प्रवासी राजा दिनाचे औचित्या साधत विभाग नियंत्रक सपकाळ यांनी पारनेर आगाराला भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. एसटीच्या ताब्यात सध्या जुन्या गाड्यांची संख्या वाढलेली असली तरी एसटीच्या नगर येथील विभागीय तसेच आगारांमधील कार्यशाळेत गाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे गाड्यांमध्ये रस्त्यावर बिघाड होण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा सपकाळ यांनी केला.
हे ही वाचा : ‘लाडकी बहीण योजना’ अडचणीत; अर्थ विभागाने केली…
पारनेर आगारात गाड्यांची देखभाल, दुरुस्ती चांगल्याप्रकारे केली जाते.त्यामुळे या आगारातून नाशिक, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गांवरील फेर्या व्यवस्थीत सुरू आहेत. पारनेर-सेल्वास या आंतरराज्य मार्गावरील फेर्याही विनाखंड सुरू असल्याचे सपकाळ यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
बसस्थानक तसेच कार्यशाळा सफाईसाठी यापूर्वी नेमलेल्या ठेकेदाराने व्यवस्थीत काम केले नाही.सध्या सफाईच्या ठेक्याची मुदत संपली आहे. पुन्हा जुन्या ठेकेदाराला सफाईचे काम देण्यात येणार नाही. सध्या स्थानिक पातळीवर सफाई कामगारांकडून सफाईचे काम करून घेतले जात असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले.
हे ही वाचा : गोदावरी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला
एसटीच्या बिघाडाचे प्रमाण कमी राहिल यासाठी प्रयत्न करावेत, गळक्या गाड्या मार्गावर पाठवू नयेत, बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अश्या सूचना सपकाळ यांनी अधिकार्यांना दिल्या.यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत, प्रभारी आगार व्यवस्थापक जगदीश क्षेत्रे, वाहतूक निरीक्षक इंद्रनील कुसकर, अमित हंपे, सहायक कार्यशाळा अधीक्षक डॅनियल आरोडे उपस्थित होते.
नगर विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर एसटीच्या फेर्या चालवल्या जातात. अनेक मार्गांवरील रस्ते खराब आहेत.त्यामुळे गाड्यांच्या बिघाडाचे प्रमाण वाढते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खराब रस्त्यांवरून फेर्या सुरू ठेवाव्या लागतात.पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होते. अपघाताची शक्यता वाढते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहन विभाग नियंत्रक सपकाळ यांनी केले.