Friday, May 3, 2024
Homeनगरमुश्रीफांच्या जागी वळसे की तनपुरे?

मुश्रीफांच्या जागी वळसे की तनपुरे?

अहमदनगर | प्रतिनिधी

मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) नगरचे (ahmednagar) पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात आहेत आणि तशी कल्पना त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

दरम्यान, पालकमंत्री पदाचा बदल घडलाच तर त्यांच्या जागी कोण, प्रश्नही चर्चेत आला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि अलिकडे जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक झालेल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची पक्ष वर्तुळात चर्चा आहे.

पालकमंत्री म्हणून नगरला (ahmednagar) अधिक वेळ देणे मुश्रीफ यांना गेल्या २ वर्षाच्या काळात शक्य झालेले नाही. याबाबत आधी पक्षातूनच नाराजी होती. अलिकडे विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत यथेच्छ टीका सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीलाही (NCP) अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नगर हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुश्रीफ यांच्याकडे नगरच्या पालकमंत्रीपदाची सुत्रे सोपवून गटा-तटाच्या राजकारणातून वाट काढली होती. मात्र मुश्रीफांचे नगरमध्ये मन न रमणे राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीसाठीच धोक्याच ठरू पाहत आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात पालकमंत्री बदलाच्या चर्चा अनेकदा झडल्या. मात्र यावेळी स्थिती वेगळी आहे. स्वतः मुश्रीफ आता हे पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हटले जात आहे. तशी इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यातच याबाबत निर्णय होईल, असेही सांगीतले जात आहे.

सध्या भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुश्रीफ यांना सामना करावा लागत आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने, त्याकडे दुर्लक्ष नको म्हणून मुश्रीफ आपल्या गृहजिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रीय करू इच्छितात, असे मानले जाते.

बेरीज-वजाबाकी

बदल घडलाच तर पुढे काय, या प्रश्नावरून विविध तर्क सुरू आहेत. नंगरच्या पालकमंत्रीपदासाठी सातत्याने ना. दिलीप वळसे पाटील यांचे नाव समोर आले आहे. त्यांनी यापूर्वी ही जबाबदारी सांभाळली आहे. मितभाषी वळसे नगरचे राजकारण ओळखून आहेत. पक्षांतर्गत गटा-तट आणि मित्र व विरोध पक्षातील नेत्यांशी त्यांनी संबंध जोपासले आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीत तरूण फळीला पुढे करण्याचे धोरण राबविले जात आहे. अलिकडच्या काळात पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पक्षाकडून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे किल्ला लढविताना दिसले. त्यामुळे त्यांच्यासाठी काही संधी असेल का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चिला जात आहे. मात्र पक्षाला आगामी राजकारणातील बेरीज-वजाबाकीचा अंदाज घेवूनच पावले टाकावी लागणार हे निश्चित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या