Thursday, September 19, 2024
Homeनगरनगरच्या पोरीचं हुशार!

नगरच्या पोरीचं हुशार!

जिल्ह्याचा बारावीचा निकाल 93.40 टक्के 96 टक्के मुली, तर 91 टक्के मुले उत्तीर्ण

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याचा निकाल 93.40 टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा निकालात 1.40 टक्के वाढ झाली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याही वर्षी कायम आहे.

व 25 हजार 675 मुली (96.48 टक्के) असे एकूण 57 हजार 877 विद्यार्थी (93.40 टक्के) या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल 92 टक्के लागला होता. त्यात 1.40 टक्के वाढ होऊन यंदा तो 93.40 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, जिल्ह्यात शेवगाव तालुक्याचा सर्वाधिक 95.62 टक्के निकाल लागला, तर सर्वांत कमी 85.80 टक्के निकाल श्रीरामपूर तालुक्याचा लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा मुलींचे अधिक आहे. यंदाही ही परंपरा कायम असून मुलींचा निकाल 96.48 टक्के, तर मुलांचा निकाल 91.08 टक्के लागला.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक
बारावीत जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 97.91 टक्के लागला. विज्ञानसाठी जिल्ह्यातून 39 हजार 430 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 38 हजार 604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 82.27 टक्के लागला. कला शाखेत एकूण 14 हजार 307 पैकी 11 हजार 770 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय वाणिज्य शाखेचा निकाल 92.11 टक्के लागला. यात 7 हजार 360 पैकी 6 हजार 779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

शंभर टक्के निकाल असणार्‍या शाळांचे शतक
मंगळवारी जाहीर झालेल्या 12 वीच्या निकालात जिल्ह्यातील 103 शाळांचा अथवा ज्युनियर महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यातील अनेक शाळांचा निकाल हा 99 टक्के असून काही ठिकाणी कला, शास्त्र, वाणिज्य असे विभाग असून यातील काही विभागाचा शंभर टक्के तर उर्वरित विभागाचा निकाल कमी झाल्याने त्या 100 टक्के निकालापासून लांब गेल्या आहेत.

26 विषयांचे निकाल 100 टक्के
विषय निकालात पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात इंग्रजी आणि मराठी विषयाचा निकाल हा 93.96 टक्के, हिंदी विषयाचा निकाल हा 96.4 तर उर्दू विषयाचा 96.7 टक्के लागलेला आहे. यासह इतिहास 9.99 टक्के, भूगोल 96.53 टक्के, राज्यशास्त्र 94.34 टक्के, अर्थशास्त्र 92.12 टक्के, भौतिक शास्त्र 98.92 टक्के, रसायन शास्त्र 99.4 टक्के, जीवशास्त्र या विषयाचा निकाल हा 98.93 टक्के लागले आहे. राज्यात बारावीसाठी असणार्‍या 154 विषयांपैकी 26 विषयाचे निकाल 100 टक्के

एकत्रित निकाल 92.33 टक्के निकाल
जिल्ह्यातील बारावीचा फे्रश विद्यार्थ्यांचा 93.40 टक्के निकाल लागलेला असून रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल हा 57.48 टक्के लागलेला आहे. या दोन्हीचा मिळुन जिल्ह्याचा एकत्रित निकाल 92.33 टक्के असून यात मुलीची टक्केवारी ही 95.75 टक्के असून मुलांची टक्केवारी ही 89.79 टक्के आहे.

विभागात नगर तिसर्‍या स्थानावर
यंदा पुणे विभागात नगर जिल्ह्याची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे. मागील वेळी नगर जिल्हा विभागात दुसर्‍या स्थानावर होता. पुणे विभाग 95.19 टक्क्यांसह पहिल्या, तर सोलापूर विभाग 93.88 टक्क्यांनिशी दुसर्‍या क्रमांकावर आहे.

तालुकानिहाय निकाल असा
शेवगाव 95.62, जामखेड 95.47, संगमनेर 95.22, नेवासा 94.66, कर्जत 94.60, नगर 94.41, राहाता 93.87, पारनेर 93.83, श्रीगोंदा 93.17, पाथर्डी 92.76, कोपरगाव 92.13, राहुरी 92.03, अकोले 90.59, श्रीरामपूर 85.80 आणि एकूण निकाल 93.40 आहे.

निकालाबाबत आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी..
ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 22 मे ते 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.गुण पडताळणीसाठी बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या