Friday, June 28, 2024
Homeनगरपोलीस भरती : 210 मुलींनी दिली मैदानी चाचणी, 38 अपात्र

पोलीस भरती : 210 मुलींनी दिली मैदानी चाचणी, 38 अपात्र

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीला तिसर्‍या दिवशी (शुक्रवारी) 415 मुलींना चाचणी देण्यासाठी बोलविण्यात आले होते.

248 मुलींनीच चाचणीसाठी हजेरी लावली. त्यातून 38 मुली शारीरिक चाचणीत अपात्र ठरल्या तर 210 मुलींनी मैदानी चाचणी दिली. बोलविण्यात आलेल्या 415 मुलींपैकी 167 मुली शारीरिक व मैदानी चाचणीसाठी गैरहजर राहिल्या. दरम्यान, तारीख बदलून दिलेल्या दोन मुलांचीही शुक्रवारी चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यात 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येत आहे. 64 जागांसाठी एकुण पाच हजार 970 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारी (19 जून) पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

पहिल्या दिवशी 206 तर दुसर्‍या दिवशी 266 मुलांनी मैदानी चाचणी दिली. शुक्रवारी (20 जून) 415 मुलींना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. पहाटे पाच वाजता चाचणीसाठी आलेल्या मुलींना मुख्यालयाच्या मैदानावर प्रवेश देण्यात आला. 248 मुलींनी मैदानावर हजेरी लावली. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात आली.

कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत 38 मुली अपात्र ठरल्या. उर्वरित 210 मुलींना चाचणीसाठी मैदानात प्रवेश देण्यात आला. मुख्यालयाच्या मैदानावर 100 मीटर धावणे व गोळा फेकची चाचणी घेण्यात आली. 800 मीटर धावणे ही चाचणी अरणगाव बायपास ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात आली. मुख्यालय मैदानावरून अरणगाव येथे जाण्यासाठी पोलीस व्हॅन ठेवण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या उपस्थितीत दररोज मैदानी चाचणी घेतली जात आहे.

दरम्यान, दोन दिवस मुलांची चाचणी घेण्यात आली. दोन्ही दिवस निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी चाचणीसाठी गैरहजेरी लावली. तिसर्‍या दिवशी मुलींना बोलविण्यात आल्यानंतर 167 मुली चाचणीसाठी गैरहजर राहिल्या. पोलीस भरतीसाठी अर्ज भरल्यानंतर चाचणीसाठीच न येणार्‍या मुला – मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या