Monday, June 24, 2024
Homeनगरगणेशोत्सव काळात पोलिसांनी सतर्क रहावे

गणेशोत्सव काळात पोलिसांनी सतर्क रहावे

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

आगामी गणेशोत्सव काळात पोलिसांनी सतर्क रहावे, गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद एकत्र असल्याने जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुढील 10 दिवसांत विविध उपाययोजना कराव्यात. ‘एक गाव-एक गणपती’ योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी केली आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी गुरूवारी नगरमध्ये पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी वरील सूचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर डॉ. शेखर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात 2432 सार्वजनिक तरूण मंडळे गणेशाची प्रतिष्ठापणा करतात, त्यामध्ये 105 खासगी आहेत तर 323 गावात ‘एक गाव-एक गणपती’ स्थापन केले जातील. गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी ‘दामिनी’ पथके ग्रामीण भागातही तैनात केले जातील. अतिरेकी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी बॉम्बशोधक पथके व श्‍वानपथकेही असतील, अचानक गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते तपासणी करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सोशल मीडियावर तेढ निर्माण होईल असे मेसेज व्हायरल केले जातात, अशा व्हायरल मेसेजवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस दल मोठ्या प्रमाणात सर्तक करण्यात आले आहे. दरम्यान, व्हॉट्सअप ग्रुपवर तेढ निर्माण होईल, असे मेसेज व्हायरल केल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा डॉ. शेखर यांनी दिला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील पोलीस चौक्या कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिली. याबरोबरच पोलीस अधीक्षक उपअधीक्षकांनी अचानक भेटी देऊन या चौक्यांमध्ये कर्मचारी, अधिकारी थांबतात की नाही, रात्री असतात की नाही, हे तपासावे असेही आदेश त्यांनी दिले.

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

उत्सव शांततेत पार पाडावा या उद्देशाने जिल्ह्यातील समाजकंटकांवर विविध स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सीआरपीसी 107 नुसार 1027 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या जाणार आहेत. 514 जणांना बजावल्या गेल्या आहेत. सीआरपीसी 110 नुसार 271, सीआरपीसी 144 (2) नुसार 899 जणांवर गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता 149 नुसार 2069 प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जातीय तेढ निर्माण करण्याच्या संशयावरून 310 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय गुन्हेगारी टोळ्या हद्दपार करण्यात आल्या असून 164 हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. 12 एमपीडीएचे प्रस्तावही प्रस्तावित आहेत.

पोलिसांना बक्षीस

पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी आपापल्या हद्दीमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ योजना प्रभावीपणे राबवावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्तीतजास्त गावातून ‘एक गाव-एक गणपती’ योजना राबवली गेल्यास त्या प्रभारी अधिकार्‍यांसाठी बक्षीस योजना राबवली जाईल, अशी माहितीही डॉ. शेखर यांनी सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या