अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू असताना नगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्यावतीने 6 जूनपर्यंत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल जाणवत असून पावसापूर्वीची चाहूल लागलेली दिसत आहे. दुसरीकडे शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असून कृषी विभागाने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला आहे.
देशात मान्सूनची वाटचाल दमदार पध्दतीने सुरू आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडूपर्यंत मान्सून येऊन ठेपला असून येत्या आठ दिवसांत राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्यात विशेष करून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी व्यक्त केलेल्या अंदाजात नगर जिल्ह्यात येत्या 6 जूनपर्यंत म्हणजे पुढील चार दिवस पावसाचा यलो अर्लट देण्यात आलेला आहे.
दुसरीकडे दिवसभराच्या उन्हाच्या चटक्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सांयकाळी ढगांची दाटी होतांना दिसत असून दमट हवामान होतांना दिसत आहे. ही पावसाची चाहूल असल्याचे जुने जाणकार यांचे म्हणणे असून येत्या 10 जूननंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.