अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी कल्याण महामार्गावरील सीना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होती. नगर शहरासह जिल्ह्यात विविध भागात ठिकठिकाणी दमदार पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी मध्यरात्री उशीरा आणि शनिवारी सकाळी नगर शहरासह उपनगरातील अनेक घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. यावेळी रात्री उशीरा खा. नीलेश लंके यांनी याठिकाणी भेट देत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तर आ. संग्राम जगताप यांनी सीना नदीच्या पुराची पाहणी करत मनपा प्रशासनास सुचना दिल्या.
नगरमध्ये शुक्रवार रात्री ते शनिवारी सकाळदरम्यान काही तासात 80 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला आहे. काल पहाटे चार वाजेपासून महापालिकेचे आपत्ती विभागचे पथक पूर आलेल्या भागात तैनात करण्यात आले आहे. पुलाचे काम सुरु असल्याने साडेचार वाजेपासून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून वारुळाचा मारुती, माधवनगर ते नेप्तीनाका असा रस्ता असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. तसेच प्रभाग अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातून सीना नदी वाहत असून पात्रामध्ये मोठी अतिक्रमणे झाली आहे. काही ठिकाणी मातीचे भराव टाकल्यामुळे पावसाळ्यामध्ये सीना नदीला पूर आल्यानंतर कल्याण राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला बंद करावा लागतो. वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. सीना नदी पात्रात मातीचा भराव, अतिक्रमण करणार्यावर महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आ. जगताप यांनी केली. तसेच महापालिका प्रशासनाने नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी काळजी घेण्याच्या सुचना दिल्या.
मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी आ. जगताप यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, माजी सभापती अविनाश घुले, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता दिलीप तारडे, युवराज शिंदे आदीसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदतीला धावले खासदार लंके
शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नरहरी नगर, गुलमोहर रोड येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अख्खी रात्री जागून काढावी लागली. नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली. त्यांनी ही माहिती खा. नीलेश लंके यांना दिली. नगरसेवक गाडे यांनी दिलेल्या माहितीची तात्काळ दखत घेत खा. लंकेंनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून, त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला. नागरिकांनी वारंवार येणार्या या समस्येचा उल्लेख केला असता खा. लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.
पावसानंतर वीज गायब
शुक्रवारी रात्री पावसानंतर जवळपास निम्म्यानगर शहरातील वीज गायब झाली होती. विशेष करून कल्याण रोड परिसारात सीना नदीजवळ वीजेचे पोल वाहून गेले. यामुळे या भागात शनिवारी दुपारी उशीरापर्यंत विज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे वीज पुरवठा करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता.