अहमदनगर | Ahmedagar
सणासुदीच्या काळात मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा करून विक्री करणार्या शहरातील प्रसिद्ध मे. हेमराज फुड्स, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दुकान व गोदामाची तपासणी करून प्रशासनाने मुद्दतबाह्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्रसिद्ध फराळ विक्रेत्याकडे मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील कोठी रस्त्यावरील सथ्या कॉलनी येथे मे. हेमराज फुड्स, केटर्स हे दुकान आहे. दिवाळी फराळ विक्रीसाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी हेमराज केटर्सच्या दुकान व गोदाची तपासणी केली. तपासणीदरम्यान मुदतबाह्य झालेली मिरची पावडर, व्हिनेगार, रामबंधू चिवडा मसाला, प्रकाश चिवडा मसाला, काळी मिरी मसाला, व्हिनेगार व्हाईट, लेमन स्क्वॅश, समाधान डिस्को पापड, शुभश्री जिरा खाकरा, बदाम थंडाई सिराफ, पायनापल स्क्वॅश आदी अन्नपदार्थांचे 150 पेक्षा जास्त पोकेट्स व 74 बॉटल्स जप्त केल्या आहेत. या मुदतबाह्य अन्नपदार्थांपासून हेमराज केटर्स येथे दिवाळीचे फराळ व मिठाई तयार होत असल्याचेही यावेळी अधिकार्यांना आढळून आले. तसेच अन्नपदार्थ तयार करत असताना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. दुकानाचा मालक विश्वजीत बोरा याने प्रशासनाची दिशाभूल करून अन्न परवाना न घेता अतिशय किरकोळ विक्री करण्यासाठी असलेला नोंदणी दाखला घेतल्याचे या कारवाई दरम्यान समोर आले आहे. अन्न प्रशासनाकडून हा नोंदणी दाखला रद्द करण्यात येणार आहे.
अधिकार्यांना दमदाटी; गुन्हा दाखल
ऐवढ्यामोठ्याप्रमाणात मुद्दतबाह्य अन्नपदार्थ सापडल्यामुळे व कारवाईच्या भितीने विश्वजीत बोरा याने कारवाई दरम्यान अडथळा निर्माण केला. अन्न सुरक्षा अधिकारी यांना दमदाटी केली. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तयार केलेला तपासणी अहवालाची प्रत स्वीकारण्यास व पोहोच देण्यास नकार दिला. तसेच तेथे उपलब्ध असलेले अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी देण्यास नकार दिला. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तयार केलेले कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला, यामुळे बोरा याच्याविरूद सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





