Thursday, May 14, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon 2026 : मान्सून नियोजित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर धडकणार, पण 'सुपर एल...

Monsoon 2026 : मान्सून नियोजित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर धडकणार, पण ‘सुपर एल निनो’चे सावट; जाणून घ्या हवामानाचा सविस्तर अंदाज

पुणे (प्रतिनिधी)

तप्त उन्हाच्या झळांनी होरपळणाऱ्या भारतीयांसाठी एक दिलासादायक, तर दुसरीकडे चिंतेत टाकणारी अशी दुहेरी बातमी हवामान विभागाने दिली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी ही की, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आपल्या नियोजित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर धडकणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘सुपर एल निनो’चा धोका असल्याने यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, १८ ते १९ मे दरम्यान मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होईल. मान्सूनचा हा पहिला टप्पा वेळेत पूर्ण होत असल्याने, १ जूनच्या सुमारास तो केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला मान्सून ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पावसावरच अवलंबून असल्याने अंदमानातील त्याच्या वेळेवर आगमनाने देशवासियांना किंचित दिलासा मिळाला आहे.

हवामान तज्ञांच्या मते, यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण होत असून तो ‘सुपर एल निनो’ ठरण्याची शक्यता आहे. समुद्रसपाटीचे तापमान सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यावर (ऑगस्ट ते सप्टेंबर) होणार आहे. हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, २०२७ च्या सुरुवातीपर्यंत एल निनोचा प्रभाव राहू शकतो, ज्यामुळे भारताच्या हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील १५ दिवस हवामानाचे विविध रंग पाहायला मिळतील. १३ मे पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील. १४ ते २१ मे दरम्यान उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण कोकण पट्ट्यात रात्रीचे तापमानही अधिक राहणार असल्याने उकाडा वाढेल. पावसाबाबत बोलायचे झाले तर, महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमीच असेल. मात्र, १४ ते २१ मे दरम्यान तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सुपर एल निनोमुळे केवळ भारतच नव्हे, तर जागतिक हवामानात मोठे बदल होणार आहेत. यामुळे जागतिक तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे भारत आणि दक्षिण आशियात पावसाची तूट असेल, तर दुसरीकडे मध्य आशिया, पेरू आणि उरुग्वे सारख्या देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका आणि कॅलिफोर्नियामध्ये यंदाचा हिवाळा कोरडा जाण्याची चिन्हे आहेत. एकंदरीत, मान्सूनचे आगमन वेळेत होणार असले तरी, ‘एल निनो’च्या संकटामुळे यंदा पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...