अहमदनगर (प्रतिनिधी) – चोरी केलेल्या कारचा वापर चंदन तस्करीसाठी होत असून भिंगार पोलिसांनी दोघा तस्करांना अटक केली आहे. नगर-जामखेड रस्त्यावर निंबोडी शिवारात रात्री ही कारवाई करण्यात आली.
बंडू अशोक बोंद्रे, (रा. लोणी मीरसय्यद, आष्टी) आणि तेजस महादेव मुठे (रा. बोल्हेगाव फाटा, नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून दोन किलो चंदनाची लाकडी, चोरीचा जेस्टा कार, मोबाईल असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
12 डिसेंबरला या तस्करांनी पुणे रस्त्यावर रामनाथ महादेव लगस, धनाजी रघुनाथ लहाणे (दोघेही रा. पाटोदा) यांची जेस्टा कारची (एम.एच.25,टी-7278) चोरी केली होती. चोरी केलेल्या या कारचा वापर ते चंदन तस्करीसाठी करत होते.
लष्कराच्या ए अॅण्ड रेजीमेंट सेंटरमधील अर्जुन पार्कमधून या तस्करांनी चंदनाची चोरी केली. चोरलेले चंदन विक्री करताना तस्कर कारने नगरकडे येत असल्याची माहिती खबर्याने भिंगार पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना दिली. राजेंद्र मुळे, अजय नगरे, जालिंदर आव्हाड, राजेंद्र सुद्रीक, भानुदास खेडकर, भागचंद लगड यांच्या पोलीस पथकाने जामखेड रस्त्यावर सापळा लावून दोघा तस्करांना जेरबंद केले.
सराईत गुन्हेगार
अटक केलेले दोघे तस्कर हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बीड आणि नगर जिल्ह्यात ते चंदन तस्करी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतही त्यांनी चोर्या केल्याची कबुली दिली असून पोलीस त्या गुन्ह्यांचा उकल करत असल्याचे सांगण्यात आले.