भिंगार कॅन्टोन्मेंट । फुलारींची चौथ्यांदा तयारी । कांता बोठे यांनीही केला दावा
अहमदनगर (प्रतिनिधी) – सलग तीन टर्म नगरसेवक असलेले शिवसेनेचे प्रकाश फुलारी यंदा वार्ड आरक्षणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या पत्नी निवडणूक लढविण्याची तयारी करत असून शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख कांता बोठे यांनीही उमेदवारीवर दावा केला असून जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे हेही नातेवाईकाला उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीच्या या रेसमुळे शिवसेनेचा उमेदवार कोण? याची उत्सुकता भिंगारकरांना लागून आहे.
1997 पासून प्रकाश फुलारी हे कॅन्टोमेंट बोर्डाचे सदस्य आहेत. पहिली टर्म अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर त्यानंतरच्या दोन टर्म शिवसेना नगरसेवक म्हणून त्यांनी कॅन्टोमेंटचे प्रतिनिधीत्व केले. यंदा त्यांचे सहा नंबर वार्ड हा महिलेसाठी आरक्षित निघाला आहे. त्यामुळे प्रकाश यांना आता थांबावे लागणार आहे. मात्र त्यांची पत्नी चंदा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.
गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असणार्या कांता बोठे यांनीही याच वार्डातून उमेदवारीवर दावा सांगितला आहे.
पक्षाकडे या वार्डातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या भिंगार शहर महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. या काळात त्यांनी पाणी, वीज, रस्ते या समस्या सोडविण्यासाठी कॅन्टोमेंटकडे पाठपुरावा केला. शिवाय आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोठा वर्ग जोडला आहे. या जमेच्या बाजू पाहूनच त्यांनी शिवसेनेकडून या वार्डात उमेदवारी मागितली आहे.
मागील टर्म या वार्डाची मतदारसंख्या अडीच हजार होती. अतिक्रमणाच्या मुद्दयावर साडेसातशे नावे मतदार यादीतून वगळली. त्यामुळे 1 हजार 700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
चंदा फुलारी आणि कांता बोठे या दोघींनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली असून दोघेही प्रबळ असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादीकडून गांधलेंची तयारी
सहा नंबर वार्डातून फुलारी यांच्या विरोधात सुदाम गांधले यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. कुटुंबातील महिलेला फुलारी यांच्या विरोधात उमेदवारी मिळावी अशी मागणी सुदाम गांधले यांनी पक्षाकडे केल्याचे समजते.
खळवाडीकर वंचित
15 वर्षे ज्या वार्डाचे प्रकाश फुलारी प्रतिनिधीत्व करतात त्या वार्डात खळवाडीचा समावेश आहे. खळवाडीतील साडेसातशे मतदार अतिक्रमणामुळे मतदार यादीतून गायब झाले आहेत. हे सगळे मतदार फुलारी यांचे हक्कमाचे मतदार होते. खळवाडीकर यंदा मतदानापासून वंचित राहिल्याचा फटका फुलारी यांना बसेेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र 15 वर्षातील कामे अन् जनसंपर्क पाहता फुलारी पुन्हा बाजी मारतील असा दावा त्यांचे समर्थक करताहेत.
दहा वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ अन् तीन वर्षापासून पदाच्या माध्यमातून मोठा समुदाय जोडला आहे. यंदा प्रथमच महिलेसाठी वार्ड आरक्षित झाला. पक्षाकडे उमेदवारी मागणी केली असून उमेदवारी नक्की मिळेल.
– कांता बोठे, इच्छुक
वार्ड आरक्षित झाला असला तरी पत्नी चंदा या निवडणूक लढविणार आहेत. सलग तीन टर्ममधील कामांच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. पक्ष उमेदवारी देईल यात शंका नाही.
– प्रकाश फुलारी, नगरसेवक