Tuesday, September 17, 2024
Homeनगरनगरमध्ये वाजत गाजत श्रींची प्रतिष्ठापना

नगरमध्ये वाजत गाजत श्रींची प्रतिष्ठापना

घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक मंडळात भक्तांचा उत्साह शिगेला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गुलालाची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात नगरकरांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणपती बाप्पांचे शनिवारी वाजत गाजत आगमन झाले आहे. बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या स्वागताने गणेशभक्त भारावून गेले. गणेशोत्साला सुरुवात झाल्याने वातावरणात चैतन्य संचारले असून अवघा जिल्हा गणेशमय झाला आहे. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना उशिरापर्यंत सुरू होती. आता पुढील 10 दिवस गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.

लाडक्या गणपती बाप्पांची वाट पाहणार्‍या भक्तांनी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. सकाळी बाप्पांची स्वारी भक्तांसोबत घरोघरी विराजमान होण्यासाठी निघाली. गणरायांचे स्वागत करण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. गणेशमूर्ती घेतल्यावर गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पांच्या नामाचा जयघोष केला जात होता. शहरात सर्वत्र घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जल्लोषात करण्यात आली. नेहमीप्रमाणे यंदाही घरोघरी विराजमान होणार्‍या बाप्पांचे स्वागत करण्यात आले. आले आले हो गणराज आले म्हणत प्रत्येकजण लाडक्या दैवताला घरी घेऊन गेले. दरम्यान, सकाळी नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व प्रिया ओला यांच्या हस्ते महापूजा करून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी महंत संगमनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरिचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, माणिक विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदींसह कर्नल डॉ. सोमेश्वर गायकवाड उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांनी ढोल पथकामध्ये सहभाग घेत ताशा वादन केले.

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे स्वागत दुपानंतर करण्यात आले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असल्याचे दिसून आला. बाप्पांच्या आगमनाने शहरात नवचैतन्य संचारले आहे.विघ्नहर्त्याला घरी नेताना आबालवृद्धांचा उत्साह अधिक दिसून आला. सकाळपासून गणेशमूर्ती नेण्यासाठी भक्तांची बाजारात झुंबड उडाली होती. शहरातील मिठाईच्या दुकानात बाप्पांसाठीचा नैवेद्य खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा, धूप, अगरबत्ती यासह पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी देखील भक्तांची गर्दी झाली होती. गणेशोत्सावाच्या खरेदीसाठी भक्तांच्या तुफान गर्दीने शहरातील बाजारपेठांचे रस्ते फुलले होते.

एक लाखांची देणगी
श्री विशाल गणेश मंदिरात आ. संग्राम जगताप व शितलताई जगताप यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी जगताप परिवाराच्यावतीने विशाल गणेश मंदिरास 1 लाख रुपये देणगी देण्यात आली. श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने आ. जगताप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पार्वतीबाई जगताप, मंदा जगताप, सुवर्णाताई जगताप, प्रा. माणिकराव विधाते, ज्ञानेश्वर रासकर, डॉ. विजय भंडारी, मनिष फुलडहाळे उपस्थित होते. यावेळी आ. जगताप म्हणाले, प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होत असते. श्री विशाल गणेशाच्या कृपेने शहराची सेवा करण्याची संधी मिळाली असून सर्वत्र विकास कामे सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

बाप्पांची सोशल वारी
बाप्पांचे घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे स्वागत धूमधडाक्यात करण्यात आले. शहरातील या चैतन्यमय वातावरणात सोशल मीडियावरही बाप्पांची स्वारी ऐटीत असल्याचे दिसून आले. गणेश चतुर्थीच्यानिमित्ताने सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर सुरू आहे. बाप्पांच्या विविध रुपांचे फोटो शेअर केले जात आहेत. गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत क्लिक केलेले सेल्फी पोस्ट केले गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या