नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जून महिन्याच्या सुरूवातीलाच अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला. या विमान अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात कशामुळे झाला याचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, या घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे. केंद्र सरकारकडून या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. हे पथक विमानात काही नुकसान (तोडफोड) करण्यात आले होते का या बाजूने देखील तपास करणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाबत माहिती दिली आहे. मोहोळ म्हणाले, “विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) अपघाताचा तोडफोडीच्या संशयातूनही तपास करत आहे.”
एका वृत्तसंस्थेशी बातचीत करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. यामध्ये विमानाच्या नुकसानाच्या बाजूनेही तपास केला जातोय. पथकाकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद पडले. एकाचवेळी इंजिन बंद पडणे फार दुर्मिळ घटना आहे. अशा घटना फार घडत नाही’, असे मोहोळ म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले, “आम्हाला तपासात विमानाचा ब्लॉक बॉक्स सापडला आहे. यामध्ये Cockpit Voice Recorder (CVR) आणि Flight Data Recorder (FDR) चा समावेश आहे. ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानची सर्व प्रकारची माहिती साठवून ठेवतो. यामुळे विमान अपघाताची कारणे समजून घेण्यास मदत होते.”
या अपघाताचे मुख्य कारण तपास अहवाल समोर आल्यानंतर समजेल. इंजिनीत बिघाड की इंधन पुरवठा होत असताना समस्या निर्माण झाली, की या अपघातामागे आणखी कोणते कारण आहे? हे तपासातून समोर येईल. या विमान अपघाताचा तपास अहवाल येत्या तीन महिन्यांत समोर येईल’, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
ब्लॅक बॉक्स कुठेही पाठवला जाणार नाही
दरम्यान, या विमानाच्या अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी विमानातील ब्लॅक बॉक्स संशोधनासाठी परदेशात पाठवला जाईल, अशा बातम्या काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, या बातम्या मोहोळ यांनी फेटाळल्या आहेत. ते म्हणाले, “विमानातील ब्लॅक बॉक्स एएआयबीच्या ताब्यात आहे. त्यांचे पथक ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण करेल. ब्लॅक बॉक्स कुठेही पाठवला जाणार नाही.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





