नवी दिल्ली। New Delhi
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची विमानतळावर (Trichy Airport) शुक्रवारी एखाद्या चित्रपटाला साजेसा असे थरार नाट्य रंगलं. त्रिची विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं आपात्कालीन लॅंडिंग करण्यात आलं आहे. हे विमान त्रिचीवरून शारजाहकडे जात होतं.
शुक्रवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाने त्रिची विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. मात्र, उड्डाण घेताच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या निर्देशनास आलं. त्यामुळे हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. अखेर काही वेळाने या विमानाला सुखरूप उतरवण्यात यश आले. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
महत्त्वाचे म्हणजे या विमानात जवळपास १४० प्रवासी प्रवास करत होते. त्रिची विमानतळाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामधील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे या विमानाचे लॅंडिंग करण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे या घटनेमुळे त्रिची विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलवण्यात आल्या होत्या.
दरम्यान विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी लोक विमानतळाबाहेर आणि जवळपासच्या घरांच्या छतावर जमले होते आणि प्रार्थना करत होते. संपूर्ण विमानतळ हाय अलर्टवर होते आणि आपत्कालीन लँडिंगसाठी सज्ज होते. बातमी प्रसारमाध्यमांद्वारे पटकन पसरली आणि लोक उत्सुकतेने पुढे काय होईल याची वाट पाहू लागली. विमानतळाभोवती गर्दी होऊ लागली. अनेक तासांच्या सस्पेन्सनंतर विमान सुखरूप खाली उतरल्याने सर्वांना दिलासा मिळाला.
विमान हवेत का फिरत होतं?
विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यासाठी इंधन कमी करण्याची गरज होती. कारण उड्डाणाच्या वेळी विमानात भरपूर इंधन असतं. जेणेकरून ते लांब पल्ल्यापर्यंत उड्डाण करू शकेल. आपत्कालीन परिस्थितीत विमान परत उतरवावे लागल्यास त्याचे वजन इंधनामुके जास्त असल्याने तसेच विमानाचा स्फोट होऊ नये या साठी विमानातील इंधन कमी केले जाते. जास्त वजनामुळे लँडिंगदरम्यान धावपट्टीवर विमानावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे विमानाला इंधनाचा वापर करण्यासाठी काही वेळ हवेत फिरावे लागते जेणेकरून विमानातील इंधन कमी होऊन ते सुरक्षितपणे उतरू शकेल.