नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवशांचा मृत्यू झाला असताना, आश्चर्यकारपणे फक्त रमेश विश्वासकुमार हे एकमेव प्रवासी वाचले आहे. यानंतर अनेकजण हा चमत्कार असल्याचे म्हणत आहेत. तर अनेकांनी हे कसे काय शक्य झाले? असा प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वत: रमेश विश्वासकुमारने दिले आहे. “विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर साधारण पुढच्या ३० सेकंदांमध्येच खूप मोठा आवाज यायला लागला आणि विमान कोसळले. या सगळ्या घडामोडी खूपच वेगाने घडल्याचे भीषण विमान अपघातामधून चमत्कारिकरीत्या बचावलेल्या एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या विमानाचा ६२५ फूट उंचीवरुन खाली कोसळल्यानंतर अपघात झाला. ज्यानंतर हे विमान मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पडले आणि भीषण स्फोट झाला ज्यातून आश्चर्यकारकरित्या त्यातून बचावले. रमेश ब्रिटीश नागरिक असून दीव येथे आपल्या भावासोबत आले होते. त्यांची पत्नी व मुले लंडनमध्ये राहतात. अहमदाबादहून ते आपल्या भावासोबत परत निघाले होते. एअर इंडियाच्या AI-171 या विमानात 11A या सीटवर ते बसले होते. त्यांच्यासह विमानात एकूण २४२ प्रवासी होते. मेघानीनगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी २४१ प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश बचावले.
रमेश विश्वासकुमार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी विचारपूस केली. दुर्घटना कशी झाली याबद्दलही त्यांनी विचारल्याची माहिती रमेशने दिली. “सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर झाले. मी त्यातून जिवंत कसा वाचलो यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. थोड्या वेळासाठी आपलाही मृत्यू होईल असे मला वाटले होते. पण डोळे उघडल्यानंतर मी जिवंत असल्याचा भास झाला. मी सीटचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि निघालो. माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस आणि इतरजण जळाले,” असे रमेशने सांगितले.
तेव्हा माझ्या आसपास लोकांचे मृतदेह होते
“विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या ३० सेकंदांमध्येच मोठे आवाज यायला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत विमान कोसळले. मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृतदेह होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते. कुणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेत नेले आणि तिथून रुग्णालयात आणले”, असेही रमेश यांनी सांगितले.
“मी ज्या बाजूला होतो ती बाजू हॉस्टेलवर लँड झाली नाही. तळमजल्यावर माझी बाजू लँड झाली होती. मी जिथे लँड झालो, ती खालची बाजू होती आणि थोडी जागा होती. दरवाजा तुटल्यानंतर जागा दिसली तर मी निघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत असल्याने कोणी निघू शकले नसणार. मी कसे वाचलो हे मलाच माहिती नाही. आगीमुळे माझा डाव हात भाजला. नंतर मला रुग्णवाहिकेतून घेऊन आले,” अशी माहिती त्याने दिली आहे.
दरम्यान, रमेश विश्वासकुमार यांनी अपघातानंतर त्यांच्या वडिलांना फोन केला होता. त्यांचे भाऊ नयन कुमार रमेश यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “अपघात झाल्यानंतर विश्वासने माझ्या वडिलांना व्हिडीओ कॉल केला. तो म्हणाला, बापरे, विमान कोसळले. मला माहिती नाही माझा भाऊ कुठे आहे. मला दुसरे प्रवासीही दिसत नाहीयेत. मी कसा जिवंत आहे हे मला माहिती नाही. विमानातून मी कसा बाहेर पडलो हेही मला आठवत नाही”, असे नयन रमेश यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





