पुणे (प्रतिनिधी)
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असून, घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना तातडीने ५,००० रुपये आणि १० किलो धान्य (५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ) देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पूरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर लोकांचे संपूर्ण धान्य भिजल्यामुळे १० किलो मदत अपुरी पडेल, त्यामुळे ही मदत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्याचबरोबर, या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रानेही मदत करावी, यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग नाही करता येत, या त्यांच्या विधानाबद्दल विचारले असता, अजित पवार यांनी सांगितले की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. ते म्हणाले, नैसर्गिक संकटाच्या वेळी राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकरी, नागरिक आणि माता-भगिनींच्या पाठीशी उभे राहते आणि राहणार आहे. मात्र, या सर्व गोष्टींसाठी आर्थिक तरतूद करावी लागते, या अर्थाने मी ते बोललो होतो. माध्यमांनी माझ्या वाक्याच्या आधी-नंतरचा संदर्भ न घेता फक्त तेवढेच वाक्य उचलून धरले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पुण्यामध्ये विविध कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांनी सांगितले की, ते स्वतः रात्रीपर्यंत पूरग्रस्त भागांत फिरत होते आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लष्कर, हेलिकॉप्टर (एअरलिफ्टिंग) आणि एनडीआरएफच्या तुकड्यांची मोठी मदत झाली. स्थानिक जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचे सर्व विभाग या मदतकार्यात गुंतले आहेत.
या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात आले असता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर केंद्र सरकार एक समिती नेमते, ज्याचे प्रमुख स्वतः अमित शहा आहेत. त्यामुळे त्यांना या परिस्थितीची कल्पना देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात पंजाब आणि हिमाचल प्रदेशात अशाच प्रकारची आपत्ती आली असता केंद्राने मदत केली होती, त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काही ठिकाणी पीक नोंदणी (पीक नोंद) झाली नसल्याने पंचनामे करण्यास ग्रामसेवकांना अडचणी येत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणले. यावर पवार म्हणाले, संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणे हे सध्या महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढला जाईल. कुणीतरी काहीतरी बोलले, यावर विश्वास न ठेवता माणुसकीने काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान सकाळी लवकर पत्रकारांशी बोलताना झालेल्या प्रकारावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जो सगळ्यात जास्त काम करतो, त्यालाच तुम्ही टार्गेट करता. सकाळी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जात असताना लगेच प्रतिक्रिया मागितली जाते आणि नाही दिली की; दादा चिडले, अशा बातम्या दिल्या जातात, असे म्हणत त्यांनी माध्यमांच्या कार्यपद्धतीवर मिश्किल टोला लगावला.
हवामान खात्याने २७, २८ आणि २९ तारखेला पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. सोलापूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगरच्या दौऱ्यात त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन विभागालाही सज्ज ठेवण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
तुळजापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचताना दिसल्याच्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारले असता, आपण सकाळपासून दौऱ्यावर असल्यामुळे याबद्दल काहीही माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच यावर प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.




