Saturday, January 17, 2026
HomeराजकीयAjit Pawar : निवडणूक हरताच अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत';...

Ajit Pawar : निवडणूक हरताच अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला ‘गोविंदबागेत’; मोठा निर्णय घेणार?

पुणे । Pune

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसल्यानंतर, राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत युती करून निवडणूक लढवली होती. मात्र, मतदारांनी या युतीला नाकारल्याचे पाहायला मिळाले असून, कोणत्याही महानगरपालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. या दारुण पराभवानंतर अजित पवार यांनी तातडीने सावध पावले टाकत आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

YouTube video player

पराभवाच्या धक्क्यातून सावरत अजित पवार यांनी शनिवारी सकाळी थेट बारामती येथील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. या महत्त्वाच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आल्याने या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, महानगरपालिका निवडणुकीत झालेला पराभव हा आमच्यासाठी चिंतनाचा विषय आहे. मात्र, या पराभवामुळे खचून न जाता दोन्ही राष्ट्रवादी आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने एकत्र लढणार आहेत. महापालिका निवडणुकीतील चुकांमधून धडा घेऊन ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी या दोन्ही गटांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका सोडून महायुतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिका निवडणुकीत युती करण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ खर्ची पडला, परिणामी प्रत्यक्ष प्रचारासाठी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. हाच फटका निवडणुकीच्या निकालांमध्ये बसल्याचे प्राथमिक विश्लेषण राजकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे. हीच चूक जिल्हा परिषद निवडणुकीत टाळण्यासाठी अजित पवार यांनी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. काकांशी चर्चा करून त्यांनी ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण जुळवण्यावर भर दिला आहे.

या संदर्भात अजित पवार आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका मांडणार आहेत. महापालिका निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठीची रणनीती यावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा हा ‘ऍक्शन मोड’ पाहता, आगामी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अधिक आक्रमकपणे मैदानात उतरतील, असे चित्र सध्या दिसत आहे.

ताज्या बातम्या

Neela Desai Passes Away : शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई...

0
मुंबई । Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या...