मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे आणि खंबीर नेतृत्व हरपले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे.
अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते. महाराष्ट्र पंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या चार महत्त्वाच्या सभांना ते उपस्थित राहणार होते. मात्र, बारामतीमध्ये उतरण्यापूर्वीच त्यांचे विमान कोसळले. या अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये विमानाची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. “मी तुला नंतर फोन करतो,” असे आश्वासन त्यांनी पाटील यांना दिले होते. बारामतीमध्ये उतरल्यानंतर सविस्तर चर्चा होणार होती, परंतु लँडिंगच्या काही वेळ आधीच काळाने घाला घातला आणि हा त्यांचा अखेरचा संवाद ठरला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते ‘लिअरजेट-४५’ (Learjet-45) हे प्रसिद्ध व्यावसायिक जेट होते. बॉम्बार्डियर कंपनीने बनवलेले हे विमान सुरक्षित मानले जाते, मात्र आज लँडिंगच्या वेळी नशिबाने साथ दिली नाही.
अपघाताची बातमी समजताच अजित पवार यांचे कुटुंबीय मुंबईतील निवासस्थानावरून बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. परिस्थिती हाताळताना पोलिसांची मोठी कसरत होत असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या एका धाडसी नेत्याच्या अशा अचानक जाण्यामुळे राजकीय वर्तुळात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.




