पुणे | Pune
“निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते आपली मत मांडत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रत्येक टिका टिप्पणीला उत्तर देणार नाही” असे अजित पवार म्हणाले. शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपली भुमिका मांडली. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेल्या राज्यसभा खासदारकी, छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांबाबत भाष्य केले.
अजित पवार यांनी ऑर्गनायझरमधून करण्यात आलेल्या टिकेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. त्यानुसार येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे”,.
हे ही वाचा : हो, मी लढण्यास इच्छुक होतो पण,…; राज्यसभा खासदारकीवरुन मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?
भुजबळ नाराज असलेल्या चर्चांवर अजित पवार म्हणाले की, “छगन भुजबळ नाराज आहेत हे धादांत खोटे आहे. काही माहिती नसताना उगाच बातम्या पेरण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी स्वत: आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनीही सांगितले आहे. तरीदेखील विरोधक किंवा मग फारच जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या तसुभरही खऱ्या नाहीत. पार्लमेंट्री बोर्डाने एकत्रित बसून हा निर्णय घेतला आहे”.
महायुतीचे नेते तिथे नव्हते?
“काल आम्ही फॉर्म भरला, पण त्याआधी एक दु:खद घटना घडलेली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचे निधन झाले. अस्थी विसर्जनासाठी त्यांना नाशिकला जायच होते. ते दोन दिवस दु:खात आहेत. एकनाथ शिंदे यांना रात्री वर्षावर जाऊन भेटलो. उमेदवाराच नाव आज किंवा उद्या ठरेल असे सांगितले. सगळ्यांनी फॉर्म भरायला याव असे मला वाटले नाही. एकनाथ शिंदे म्हणाले फॉर्म भरुन या. महायुती सोबत आहे. मीच त्यांना बोलावल नव्हते. तरीही बातम्या चालवल्या महायुतीचे नेते दिसत नाहीयत म्हणून. व्यक्ती दु:खात असताना फॉर्म भरायला चला असे म्हणण योग्य वाटत नाही” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ उपस्थित होते. चौघांनाच आत प्रवेश असतो त्यामुळे ते आत गेले”. मला कोणाच्याही टीकेवर बोलायचे नाही असे सांगत त्यांनी जास्त भाष्य करणे टाळले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा