बारामती । Baramati
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे आता काका-पुतण्या यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा-जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे.
तसेच, त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे. मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी (शरद पवार) असं करायला नको होतं. लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली, ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा त्यांनी (शरद पवार यांनी) करायला नको होती, पण चूक केली आहे. आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार युगेंद्र पवारांबद्दल काय म्हणाले?
मी हे म्हणणं योग्य आहे की नाही पण बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती क्वचितच कोणाल असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकारणात शक्ती देण्याचं काम बारामतीकरांनी केलं. त्याची सुरुवात 1965 सालापासून ते आजपार्यंत आहे. मी आतापर्यंत इतक्या निवडणुकींना मी उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथं राहावं लागायचं. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.