Thursday, September 19, 2024
Homeनगरअकोले विधानसभेवर काँग्रेस पक्ष दावा करणार - नवले

अकोले विधानसभेवर काँग्रेस पक्ष दावा करणार – नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

अकोले विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेस पक्ष आगामी 2024 ची अकोले विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाचे ज्येेष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी केला आहे. 2019 च्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले, मात्र, त्यांना अकोले तालुक्यातून 33 हजारांचे मताधिक्य मिळाले होते व 2024 च्या निवडणुकीतही मविआचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मताधिक्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे.

काँग्रेस पक्ष आदिवासी बहुल व बिगर आदिवासी भागात वेगवेगळी विधाने करत नाही तर काँग्रेसच्या सर्वधर्मसमभाव या विचाराशी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबईत घेण्यात आलेल्या मुलाखतीत अकोलेसाठी सतिश भांगरे यांनी मुलाखत दिलेली असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेत्यांना भेटून आम्ही मागणी करणार आहे. अकोले विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेस पक्ष ही 2024 ची अकोले विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे मधुकरराव नवले यांनी सांगितले. आगामी अकोले विधासभा निवडणुकीतील धोरणाबाबत माहिती देण्यासाठी अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी श्री. नवले बोलत होते.

याप्रसंगी युवा सतिश भांगरे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे, सोन्याबापु वाकचौरे, मंदाबाई नवले, रमेश जगताप, पोपट नाईकवाडी, ज्ञानेश्वर झडे, आरिफभाई तांबोळी, शंकरराव वाळूंज, रजनीकांत भांगरे, संपत कानवडे, अनिल वैद्य, भास्कर दराडे, साईनाथ नवले, रामदास धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. नवले म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काँग्रेस निवडणुक लढवित आहे. यात अकोले विधानसभेची जागा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच मिळावी, ही आमची जोरदार मागणी व दावा आहे. सर्वधर्मसमभाव हा काँग्रेस चा विचार आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. अकोले तालुका नेहमी काँग्रेसच्या विचारधारे बरोबर राहिला आहे. अकोले मतदारसंघावर दावा करताना आम्हांस आसुरी आनंद लुटायचा नाही.

पण अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील लोक, पुढारी, नेते, अकोल्यात काँग्रेस पक्ष गृहीत धरून राजकीय वाटचाल करीत असतील तर काँग्रेस पक्षाला स्वतंत्र अस्तित्व आहे व ते तो 2024 विधानसभा निवडणुकीतून सिद्ध करील, असा विश्वास नवले यांनी व्यक्त केला आहे. ज्येेष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे म्हणाले, या देशाच्या विकासाची पायाभरणी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून झाली असून भाजपा त्याच पायाभूत सुविधांवर पुढील वाटचाल करीत आहे, मात्र आज काँग्रेसने 75 वर्षात काय केले हा धोशा लावून धरत आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मधुकरराव नवले यांनी समर्पक उत्तरे दिली. महाविकास आघाडीचे नेते जे उमेदवार देतील त्यांचा प्रचार करू, मात्र काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही ताकद लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या