अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले पंचायत समितीच्या बारा गणांसाठी सोमवारी (दि.13) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. बारापैकी दहा जागा विविध घटकांसाठी आरक्षित असून दोनच जागा खुल्या वर्गासाठी आहे. तर जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी पाच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असून केवळ धामणगाव आवारी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.
मवेशी, वारंघुशी, सातेवाडी, खिरविरे, राजूर व समशेरपूर हे सहा गण अनुसुचित जमातीसाठी आरक्षित आहेत. यातील मवेशी, सातेवाडी आणि खिरविरे हे गण अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असून उर्वरित तीन गण अनुसूचित जमाती व्यक्तीसाठी आरक्षित आहेत. कोतूळ गण अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन गण आरक्षित झाले असून त्यातील गणोरे आणि धामणगाव आवारी हे गण याच प्रवर्गातील महिलांसाठी तर धुमाळवाडी गण या प्रवर्गातील व्यक्तीसाठी आरक्षित आहेत.
देवठाण आणि ब्राम्हणवाडा हे दोन गण सर्वसाधारण राहिले असून त्यातील ब्राम्हणवाडा गण सर्वसाधारण महिलेसाठी तर देवठाण गण सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित आहेत. सभापती पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून मवेशी, वारंघुशी, सातेवाडी, राजूर, खिरविरे व समशेरपूर या गणातून निवडून येणार्या व्यक्तींपैकी एक अकोल्याचा सभापती होणार आहे. या आरक्षणामुळे पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सहा गटांपैकी पाच गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. तर फक्त धामणगाव आवारी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.
या आरक्षणामुळे जिल्हा परिषद सदस्यपदाची स्वप्ने पाहणार्या अनेकांचा स्वप्नभंग झाला असून जिल्हा परिषदेत जाण्याच्या त्यांच्या इच्छा या निवडणुकीत पूर्ण होणार नाहीत. सातेवाडी, राजूर, समशेरपूर, कोतूळ, देवठाण हे पाच गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. त्यातील सातेवाडी व देवठाण हे गट या प्रवर्गातील महिलांसाठी तर राजूर, समशेरपूर व कोतूळ हे गट या प्रवर्गातील व्यक्तीसाठी आरक्षित झाले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार अकोले तालुक्याची एकूण लोकसंख्या 2 लाख 72 हजार 136 आहे. त्यात अनुसूचित जातीची 11 हजार 670 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 38 हजार 168 इतकी आहे.
तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी अनुप सिंह यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे हे उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यमान सदस्यांपैकी अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, कोतूळ गटाचे माजी सदस्य रमेश देशमुख यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी मागील दोन निवडणुकांत समशेरपूर गटाचे प्रतिनिधित्व केले. या दोघांनाही आता जिल्हा परिषदेची निवडणूक त्या गटातून लढविता येणार नाही.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, माजी आमदार वैभव पिचड यांच्या पत्नी पूनम पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. यापैकी कोण निवडणूक लढविणार? लढविण्याचे ठरविल्यास कोणत्या गटातून लढवणार? याबाबत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. धामणगाव आवारी गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत कैलास वाकचौरे करीत होते. हा गट आता नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी शर्मिला वाकचौरे उभ्या राहतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिता मोरे यांनी शिवसेनेकडून या गटाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
त्याही ही निवडणूक लढवू शकतात. त्यांचे पती डॉ. मनोज मोरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आहेत. त्यामुळे या पक्षातर्फे उभ्या राहणार की शिवसेनेचा भगवाच पुन्हा हाती घेणार याबाबतही उत्सुकता आहे. अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, शिवसेना शिंदे गटाचे बाळासाहेब भोर, जगन देशमुख, राष्ट्रवादीचे पर्बत नाईकवाडी, विकास शेटे, भाजपचे अप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शेळके, भाजपचे मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, म्हाळादेवीचे माजी सरपंच प्रदीप हासे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश नवले, ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाळे, कोतूळचे माजी सरपंच राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे बबलू देशमुख आदी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेत जाण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार आहे.




