अकोले |प्रतिनिधी| Akole
शहरासह पूर्व भागाला गुरुवारी दि. 9 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने झोडपले. या पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आंब्याच्या झाडांवरील कैर्या गळून पडल्या. शेतात साठवलेला कांदा भिजला. टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. वादळात खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता. तर अचानक पडलेल्या या पावसाने आठवडे बाजारात आलेल्या लहान-मोठ्या व्यापारी, शेतकर्यांची तारांबळ उडाली.
दिवसभर वातावरण ढगाळ बनले होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळास सुरुवात झाली. पाठोपाठ पाऊसही कोसळू लागला. जोडीला विजांचा कडकडाटही सुरू होता. जोरदार सोसाट्याच्या वार्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, आंब्यांच्या झाडाखाली कैर्यांचा सडा पडला. शहरात ठीकठिकाणी लावलेले फ्लेक्स व पाट्या कोसळल्या. रस्त्याच्या कामासाठी कारखाना रोड खोदून ठेवला आहे. बस स्थानकाचेही काम सुरू आहे, याठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून त्यास तळ्याचे स्वरुप आले. कोल्हार-घोटी रस्त्याला गटारी काढल्या असल्या तरी त्यात तांत्रिक दोष असल्यामुळे पावसाचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यावरूनच वाहत होते.
गुरुवारी अकोलेचा आठवडे बाजार असतो. तीव्र उन्हामुळे ग्राहक, दुपार ऐवजी सायंकाळनंतरच बाजारला येतात, आठ-साडेआठपर्यंत बाजारातील व्यवहार सुरू असतात. अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापार्यांचे, शेतकरी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पावसापासून बचाव करताना त्यांची तारांबळ उडाली. सध्या अनेक ठिकाणी काढलेला कांदा शेतातच साठून ठेवलेला आहे तोही भिजला. वादळातच शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले. सुमारे तासभर या पावसाचा धुमाकूळ सुरू होता. पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी वीज गायब असल्यामुळे पंखे, एसी, कुलर बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांना रात्र तळमळत काढावी लागणार आहे. जोडीला डासांचाही सामना करावा लागत आहे.