अमोल वैद्य |अकोले| Akole
अकोले विधानसभेच्या इतिहासात प्रथमच पंचरंगी लढत होत असून पाच तुल्यबळ उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. जाहीर सभा व सोशल मीडियातून होणार्या आरोप-प्रत्यारोपांबरोबरच भेटीगाठी, पदयात्रा यामुळे निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून प्रथमच तीन बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित भांगरे, महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार डॉ. किरण लहामटे, भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, शिवसेना बंडखोर मधुकर तळपाडे व माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे पाच प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय अन्य चार जणही आपले नशीब आजमावत आहेत. यातील प्रमुख पाचही उमेदवाराची स्वत:ची काही बलस्थाने आणि राजकीय ताकद आहे. मागील निवडणुकीत सरळ लढतीत डॉ. किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मात्र त्यावेळेला त्यांच्या बरोबर असणारे बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले आहेत. ते महायुतीचे उमेदवार असेल तरी काही अपवाद वगळता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा त्यांच्यासोबत नाही.
डॉ. लहामटे सध्या एकाकी लढत असल्याचे दिसत असले तरी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांची त्यांना खंबीर साथ लाभली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गायकर हेच त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे दिसत आहे. अमित भांगरे यांच्या मागे महाविकास आघाडीतील विविध पक्ष खंबीरपणे उभे आहेत. ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, माकपचे नेते डॉ. अजित नवले, भाकपचे नेते कारभारी उगले यांच्या आक्रमक प्रचाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे डॉ. लहामटे यांच्यावर होत असणारा गद्दारीचा आरोप, त्यांच्या विकासकामांतील उणिवा दाखवत विद्यमान आमदारांवर त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माजी आमदार वैभव पिचड यांनी वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड हे गंभीर आजारी असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निवडणूक हातात घेतली आहे. माजी मंत्री पिचड यांनी सात निवडणुका जिंकल्या. त्यामुळे मतदारसंघात त्यांना मानणारे अनेक जुने कार्यकर्ते असून त्यातील अनेकजण प्रचारात सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे हे डॉ. लहामटे यांची साथ सोडत वैभव पिचड यांच्या प्रचारात सहभागी झाले. यंदा वैभव पिचड यांना सहानुभूतीचा राजकीय लाभ होणार का, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनीही युवकांचे मोठे संघटन निर्माण केले आहे. मतदारसंघात आदिवासी ठाकर समाजाची संख्या मोठी असून या समाजातील अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सहभागी आहेत. भेटीगाठी, पदयात्रा या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात होणार्या मतविभागणीत आपला उमेदवार विजयापर्यंत पोहचेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. तर दोनवेळा विधानसभा निवडणूक लढविणारे शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. उघडपणे शिवसेना ठाकरे गट त्यांच्या मागे प्रचारात दिसत नसला तरी दोनवेळा निवडणूक लढविलेली असल्यामुळे त्यांचा मतदारसंघातील, वाडी-वस्तीवरील शिवसैनिकांशी वेळोवेळी संपर्क आलेला आहे. तीन प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे विजयी उमेदवाराला फार मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता कमीच आहे.