मुंबई | Mumbai
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलिसांकडून (Police) एन्काऊंटर (Encounter) करण्यात आला होता. त्यानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवत पोलिसांकडून आरोपीचा खून करण्यात आल्याचे म्हटले होते. यानंतर आता याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला असून आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) आणि मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, न्यायालयाचा निर्णय सरकारला चपराक म्हणता येणार नाही. बदलापूरमधील एन्काऊंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन.या फेक एन्काऊंटर घटनेसंदर्भात आयोगाकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. पण, माहिती घेऊन व्यक्ती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्की कर. आयोगाकडे तक्रार आल्यावर कोणालाही सोडणार नाही. सगळया घटनांचा पाठपुरावा करू, सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करत आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच विरोधक महाराष्ट्र असुरक्षित असल्याची विधाने करतात, मात्र ते हे आरोप निवडणुकीतील पराभवामुळे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तर मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) म्हणाले की, “बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल सादर केला, त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, किंवा जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री शंभुराज देसाई यांनी न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात मला माहीत नाही, मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून माहिती घेतो, त्यांनतर बोलतो अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
अहवालात नेमकं काय?
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात (Court) वाचन केले. त्या म्हणाल्या की, ‘त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते. झटापटीत अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला, हे पोलिसांचे म्हणणेही न्यायोचित वाटत नाही. गोळा केलेले पुरावे आणि न्यायसहायक प्रयोगशाळेचा अहवाल लक्षात घेता, अक्षय शिंदे याच्या पालकांचे आरोप योग्य वाटतात. पोलिस या मृत्यूला जबाबदार आहेत, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नोंदवला आहे”, असे त्यांनी सांगितले.