Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याझिरवाळांना धोक्याची घंटा

झिरवाळांना धोक्याची घंटा

दिंडोरी । संदीप गुंजाळ Dindori

राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाभूकंपाचे हादरे दिंडोरी-पेठ मतदारसंघाला बसले आहेत. अजित पवार गटाच्या शपथविधीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार समर्थक म्हणून हजेरी लावल्याने मतदारसंघात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार की अजित पवार? या विचारात सापडलेल्या झिरवाळांची प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त झालेली नाही. तथापि दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ व एकनिष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादीचा शरद पवार यांना पाठिंबा वाढला आहे. झिरवाळांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. विधानसभेची लढत ही आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच झाली आहे. सध्या भाजपने आपले प्रस्थ वाढवण्यासाठी सुरुवात केली असून काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांनीही तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवले आहे. 1999 पर्यंत दिंडोरीत काँग्रेस पक्ष ताकदीने उभा होता. मात्र नंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर श्रीराम शेटे यांनी पवारांंसोबत जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून दिंडोरीचा उल्लेख केला जातो. 2009 चा निसटता पराभव वगळला तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच झेंडा कायम आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी आमदार रामदास चारोस्कर व माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंंतर शिवसेनेकडून उमेदवारी मिळवताना झालेल्या अंतर्गत कलहात पेठचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ पडली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रांतवाद कळीचा मुद्दा ठरला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसची महाविकास आघाडी तयार झाली. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिंदे गट आणि ठाकरे गट तयार झाले. अपेक्षेप्रमाणे दोन माजी आमदार एकाच पक्षात असणे अवघडच होते. त्यामुळे शिंदे गटात माजी आमदार धनराज महाले यांनी प्रवेश करून शिंदे गटाचे उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे.

माजी आमदार रामदास चारोस्कर आज ठाकरे गटात असल्याचे बोलले जात असले तरी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांची असलेली अनुपस्थिती चर्चेची ठरत आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीतदेखील दुफळी निर्माण झाली आहे. अजित पवारांबरोबर जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली. त्यांच्याबरोबर विधानसभा उपाध्यक्ष व आमदार नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती मतदारसंघात चर्चेची ठरली. परंतु शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून श्रीराम शेटे यांना ओळखले जाते. त्यांनी शरद पवारांना साथ दिल्याने झिरवाळांची गोची होणार यात शंका नाही. राष्ट्रवादीचे कट्टर व ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पसंती दिल्याने दिंडोरी मतदारसंघात अजित पवारांपेक्षा शरद पवारांना वाढता पाठिंबा दिसत आहे.

हा वाढता पाठिंबा नक्कीच नरहरी झिरवाळ यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार होऊन शरद पवार गटाचा उमेदवार देण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व श्रीराम शेटे यांचे कट्टर समर्थक भास्कर भगरे हे नाव पुढे येऊ शकते. यावेळी श्रीराम शेटे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, हेदेखील तितकेच खरे! त्याचबरोबर या सत्तासंघर्षात काहीकाळ श्रीराम शेटे यांच्या सोबत असलेले माजी आमदार आपल्या समर्थकांसह श्रीराम शेटे यांच्या गोटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सत्तासंघर्ष हा विकोपाला गेल्यास परिस्थितीनुसार तो पर्यायदेखील निवडला जाऊ शकतो. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नसली तरी लवकरच त्यांच्या कृतीतून भूमिका स्पष्ट होणार आहे. यावरून येणार्‍या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याने झिरवाळांच्या भूमिकेकडे अवघ्या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

शेटेंची भूमिका निर्णायक

राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांना दिंडोरी तालुक्यात राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरते. राष्ट्रवादीत त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याने विधानसभेचे समीकरण बदलले जाणार यात शंका नाही. त्यामुळे झिरवाळांची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर झिरवाळांनी अजित पवारांची वाट धरली आणि श्रीराम शेटे यांना पर्यायी उमेदवार देण्याची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्याचबरोबर माजी आमदार रामदास चारोस्कर व धनराज महाले यांच्यात समेट घडवून आणता येऊ शकतो.

कारण धनराज महाले यांना खासदारकीचे वेध लागले आहेत तसेच रामदास चारोस्करांना विधानसभेच्या वाटेतील अडसर दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा पर्याय धनराज महाले यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो. असे झाल्यास माजी आमदार रामदास चारोस्कर हे झिरवाळांसमोर भक्कम आव्हान उभे करू शकतात. सध्याच्या परिस्थितीत रामदास चारोस्कर यांनी मतदारसंघात वैयक्तिक ताकद उभी केली असून त्याचा फायदा त्यांना विधानसभेत मिळणारच आहे. त्यामुळे ही जागा कोणत्या उमेदवाराला कोणत्या चिन्हावर लढवावी लागेल, याची शक्यता आज सांगता येत नसली तरी सत्तासंघर्षाच्या निवडणुकीत झिरवाळांपुढे माजी आमदार रामदास चारोस्कर यांचे मोठे आव्हान उभे राहू शकते. यात मात्र श्रीराम शेटे यांची भूमिका निर्णायक ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या