अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 25 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. सारसनगर व केडगाव उपनगरात पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केडगावात हातभट्टीची विक्री होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केडगाव येथील सोनेवाडी रस्त्यावरील गोपाळवस्ती येथील शासकीय शौचालयामागे जाऊन खात्री केली असता तेथे गावठी हातभट्टीची विक्री होत असल्याने दिसून आले. विक्री करणार्याला पकडले असता त्याने त्याचे नाव शुभम विजय शिंदे (वय 22 रा. केडगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चार हजार 500 रुपये किमतीची दारू जप्त करून जागीच नष्ट केली.
तसेच सारसनगर येथील सीना नदी लगत विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्या एकाला पोलिसांनी पकडले. त्याने त्याचे नाव विठ्ठल गोविंद कर्पे (वय 37 रा. मार्केटयार्ड मागे, सारसनगर) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 21 हजार रुपये किमतीची 200 लिटर दारू जप्त करून नष्ट केली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, सुजय हिवाळे आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली.