मुंबई | Mumbai
मीरा-भाईंदर येथे मनसेच्या शाखेचे उदघाट्न केल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेवरून गरळ ओकणाऱ्यांना गर्भित इशारा दिला. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचे काही भांडण नाही तुमच्याशी, पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, अशा शब्दात सुनावले. ‘मनसेचे लोक गरीब हिंदूनाच मारतात’, या मंत्री नितेश राणेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेत्यांनी राणे कुटुंबाबद्दल गंभीर आरोप केले. राणे कुटुंबाने ज्या लोकांचे खून केले, ते सगळे हिंदूच होते. त्यावेळी नितेश राणेंनी वडिलांना का सांगितले नाही की, आपण हिंदूनाच मारतोय”, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून काही नागरिकांसह व्यापाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. त्या घटनांचा हवाला देत मंत्री नितेश राणे यांनी मनसेचे लोक फक्त गरीब हिंदूनाच मारतात, अशी टीका केली. राणेंच्या या टीकेनंतर अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी आरोप केले.
नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव?
अविनाश जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कानडी होते का? तमिळ होते की ख्रिश्चन होते? ती सगळी कुटुंब हिंदू मराठी होते, सगळेच हिंदू होते. त्यावेळी वडिलांना का नाही सांगितले हिंदूचा खून करतोय म्हणून? अशी विचारणा अविनाश जाधव यांनी केली. ते पुढे म्हणाले की, कोणाच्या सांगण्यावर बोलता, बोलताना एकदा तरी विचार करा आपण काय बोलत आहोत. किती दिवस भांडी घासणार? पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? विचार न करता समोरची स्क्रीप्ट वाचतोय, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
संदीप देशपांडे यांनी तर थेट नावच घेतली. देशपांडे म्हणाले, “सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक हिंदू नव्हते का? गायब झालेले रमेश कोल्हेकर हिंदू होते की नव्हते? याची त्यांनी उत्तरे द्यावीत. मग आमच्यावर आरोप करावा”, असा सवाल संदीप देशपांडेंनी नितेश राणेंना केला.
तर ते पंखा हलवणार का?
नितेश राणे यांनी मीरा रोडच्या नया नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानले जात नाही. तिथल्या गोल टोपी वाल्यांच्या तोंडून मराठी कधी निघणार? अशी विचारणा केली होती. यानंतर संदीप देशपांडे यांनी सुद्धा पलटवार नितेश राणे यांना फटकारले होते. सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असेल तर मंत्री म्हणून मिरवणारे नितेश राणे काय करणार? ते पंखा हलवणार का? अशा शब्दात खिल्ली उडवली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




