नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली अनोखी प्रचारपद्धत सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. “फक्त एक मत मला द्या, बाकी तीन मते कुणालाही द्या” असे थेट मतदारांना सांगत या उमेदवारांनी प्रचार सुरू केल्याने राजकीय वर्तुळासह सामान्य मतदारांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे.
सामान्यतः निवडणूक प्रचारात “सगळी मते मला द्या”, “पूर्ण पॅनल निवडून द्या” अशा घोषणा दिल्या जातात. मात्र काही उमेदवारांनी त्याला छेद देत अगदी साध्या आणि थेट शब्दांत मतदारांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. प्रभागात घरोघरी जाऊन, चौकात थांबून, छोठ्या बैठका घेत मतदारांना सांगण्यात येत आहे की, “तुम्ही कोणाला मत द्यायचे हे तुमचे स्वातंत्र्य आहे. मला फक्त एक संधी द्या, माझे काम पाहा. या प्रचारशैलीमुळे काही मतदारांमध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय ‘कौटुंबिक रणांगण’
तर काहीजण मात्र या प्रचाराकडे संशयाने पाहत आहेत. “ही प्रसिद्धी मिळवण्याची शक्कल आहे.” “नंतर सगळी मते मागणारच,” अशी कुजबुजही सुरू आहे. राजकीय कार्यकत्यांमध्येही या घोषणेवरून चर्चा रंगली आहे. काहींच्या मते, प्रभागातील मतविभाजन लक्षात घेऊन ही खेळी आखण्यात आली असावी. अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने एक मत मागून मतदारांचा रोष टाळण्याचा आणि स्वतःसाठी किमान आधारभूत मते सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तर काही जण म्हणतात की, ही भूमिका म्हणजे प्रस्थापित राजकारणावर सूचक टीकाच आहे.
दरम्यान, संबंधित उमेदवार आपल्या प्रचारात मोठमोठ्या सभा टाळत छोठ्या संवादावर भर देत आहे. रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, कचरा, स्ट्रीटलाइट, मूलभूत नागरी प्रश्न यांवर तो बोलतो आणि “मी सर्व प्रश्न लगेच सोडवीन असे आश्वासन देत नाही, या अनोख्या प्रचारशैलीमुळे इतर उमेदवारही सावध झाले असून, काहींनी आपल्या प्रचाराची भाषा बदलण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या धामधुमीत “एक मत मागणारा उमेदवार” ही ओळख कितपत यशस्वी ठरणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या घोषणेने स्थानिक राजकारणाला वेगळीच रंगत आणली आहे.
हे देखील वाचा : Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना सल्ला




