मुंबई | Mumbai
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारी होते. अजित पवार यांनी महायुती सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळेच सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीनेच अडचणीत आणायचे.. भारतीय जनता पार्टीनेच बाहेर काढायचे हे काम या प्रकरणात करण्यात आलेय. कंपनीचा डायरेक्टर असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही? मुद्रांक शुल्क चुकवले जाते म्हणून कारवाई होते. व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचे असे सांगितले जाते. मात्र, जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियम आहे.
जर एखादा व्यवहार रद्द केला तर तेवढेच मुद्रांक शुल्क सरकारला भरावे लागते. बावनकुळेंनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. पार्थ पवारला भारतीय जनता पार्टी वाचवत आहे. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का? ज्याने लोकसभा लढवली आहे आणि लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कुणाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक देऊ नये, भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे.
या प्रकरणात तहसीलदार एक प्यादा आहे. या मागे मोठी साखळी असुन जिल्हाधिकाऱ्यांना देखील अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाल पाहिजे, अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा दाखला देत पार्थ पवार यांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. बावनकुळे यांना उद्देशून ‘तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री तूम्ही म्हणता की ‘तपासावे’ लागेल!
त्यादिवशी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकांमध्ये मला मिळालेला माहितीनुसार. अजित पवारांनी रागाने, त्वेशाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतल्याचे माझ्या कानावर आहे. दाव्याने हे बोलतोय. खरे खोटे बाहेर येईलच. अशाप्रकारे पार्थ पवारांना वाचवले जातंय. हे सर्व होणार याची कल्पना भारतीय जनता पार्टीला होती, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




