अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने सुमारे दोन हजार 200 कर्मचार्यांची नियुक्ती केली असतानाच, तब्बल 468 कर्मचार्यांनी ‘इलेक्शन ड्युटी नको’ असे अर्ज सादर केल्याने निवडणूक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आजारपण, आई-वडील आजारी, पत्नी अथवा मुलांचा आजार, अपघात, तसेच मुलांच्या परीक्षा अशी विविध कारणे देत कर्मचार्यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे अर्ज दाखल केले आहेत.
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने व्यापक तयारी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, महापालिका, महसूल, जलसंपदा, बांधकाम विभाग तसेच शिक्षण विभागातील कर्मचार्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी प्रत्येक कर्मचार्याला स्वतंत्र आदेश काढून ते संबंधितांपर्यंत पोहोचविले आहेत.
निवडणूक प्रक्रियेपूर्वी पहिले प्रशिक्षण घेण्यासाठी कर्मचार्यांना चार दिवसांपूर्वी बोलावण्यात आले होते. मात्र, या प्रशिक्षणास तब्बल 400 कर्मचारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उद्या होणार्या दुसर्या टप्प्यातील प्रशिक्षणास सर्व कर्मचार्यांना अनिवार्य हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याआधीच 468 कर्मचार्यांनी निवडणूक ड्युटीमधून वगळण्यात यावे अशी लेखी विनंती केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या अर्जांमध्ये कोणाला छातीत दुखणे, पोटदुखी, दीर्घ आजाराचे कारण दिले आहे, तर काहींनी आई-वडील गंभीर आजारी असल्याचे नमूद केले आहे.
काही अर्जांमध्ये पत्नी अथवा मुलांच्या आजारपणाचा उल्लेख असून, काहींनी मुलांच्या परीक्षा असल्याचे कारण दिले आहे.
दरम्यान, निवडणूक ड्युटी नको, असे अर्ज करणार्या कर्मचार्यांच्या प्रकरणांची शहानिशा करण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. तसेच, ज्या कर्मचार्यांची ड्युटी रद्द केली जाईल, त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी देण्याची जबाबदारीही विभागप्रमुखांनाच देण्यात आली आहे.
अर्जदार कर्मचार्यांनी दिलेल्या कारणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. कारण योग्य आणि वैद्यकीयदृष्ट्या सिध्द झाल्यास संबंधित कर्मचार्यांची निवडणूक ड्युटी रद्द केली जाईल. मात्र, कारण बनावट किंवा समाधानकारक नसल्यास संबंधित कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




