Friday, January 23, 2026
HomeनगरAMC Election : महायुतीत राष्ट्रवादीच दादा….कुमार वाकळेंसह भागानगरे बिनविरोध

AMC Election : महायुतीत राष्ट्रवादीच दादा….कुमार वाकळेंसह भागानगरे बिनविरोध

समर्थकांनी केला जल्लोष || उद्याच्या अर्ज माघार मुदतीकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुकांनी तब्बल 788 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीनंतर आज अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 28 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. याच प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवत निवडणुकीतील विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 8 (ड) मधून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कुमार वाकळे तर प्रभाग क्रमांक 14 (अ) मधून प्रकाश भागानगरे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, मनसे तसेच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत 788 पैकी 17 अर्ज बाद ठरविण्यात आले. यामध्ये शिवसेनेच्या पाच उमेदवारांचा समावेश असल्याने तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बहुतांश इच्छुकांनी तीन ते चार प्रभागांतून अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर उमेदवारांकडून लेखी स्वरूपात अंतिम प्रभागाची निवड मागविण्यात आली.

YouTube video player

त्यानुसार 17 प्रभागांतील 68 जागांसाठी 477 इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. उर्वरित अर्ज आपोआप बाद ठरविण्यात आले. गुरूवारी (1 जानेवारी) अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी 28 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता एकूण 449 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. प्रभाग क्रमांक 8 (ड) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे आणि अपक्ष पोपट कोलते यांचे अर्ज वैध होते. मात्र पोपट कोलते यांनी अर्ज मागे घेतल्याने वाकळे बिनविरोध विजयी झाले. त्याचप्रमाणे प्रभाग 14 (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भागानगरे यांच्या विरोधात चार अपक्ष उमेदवार होते. त्या चौघांनीही अर्ज माघारी घेतल्याने भागानगरे बिनविरोध विजयी झाले. दरम्यान, आज (शुक्रवार, 2 जानेवारी) अर्ज माघारीची अंतिम मुदत असून दुपारी तीन वाजल्यानंतर महापालिका निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

वाकळे झाले बिनविरोध
30 डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या 17 प्रभागांतील मिळून 788 उमेदवारी अर्जांची छाननी काल बुधवारी 31 डिसेंबरला झाली. या छाननीत 17 अर्ज बाद झाले. त्यावर सुनावणी व निर्णय प्रक्रिया झाली. त्यानंतर अर्ज माघारीच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 8 मधील ड – या सर्वसाधारण प्रवर्गात मोठी राजकीय घडामोड घडली. छाननीत या प्रभागातील राहुल कातोरे नावाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रिंगणात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कुमारसिंह वाकळे व पोपट कोलते असे दोनच अर्ज राहिले होते. यातील कोलते यांनी आजच माघारीचा अर्ज दिल्याने वाकळे एकमेव उमेदवार रिंगणात राहिले व बिनविरोध झाले. अर्थात, 16 जानेवारी रोजी अंतिम निकाल जाहीर होतील, त्यावेळी त्यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर होईल. या प्रभागात अर्ज छाननीनंतर सुरुवातीला दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कुमारसिंह बबनराव वाकळे आणि अपक्ष उमेदवार कोलते पोपट मुरलीधर यांचा समावेश होता. मात्र, आज सकाळी कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुमारसिंह वाकळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग 8 मधील शिवसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या सहीवर आक्षेप घेण्यात आला. अनुमोदकाच्या सहीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर सही चुकीची असल्याचे समोर आले असून, त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर कोलते यांनीही माघार घेतल्यामुळे वाकळे यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.

कोणाचे उडले…उत्सुकता शिगेला
महापालिकेच्या 17 प्रभागांमधील 68 जागांसाठी दाखल झालेल्या 788 उमेदवारीअर्जांची छाननी करण्यात आल्यावर यात 17 अर्ज अवैध ठरवण्यात आले व 771 अर्ज वैध ठरवण्यात आले. अवैध ठरलेल्या अर्जांवर सुनावणी झाली. आक्षेपांवर उमेदवारांची बाजू समजून घेतली गेली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने निर्णय होत गेले. मात्र, शहरात कोणाचे अर्ज उडले व कोणाच्या समोर कोण राहिले, याची उत्सुकता व्यक्त होत होती. उद्याच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी कोण रणछोडदास होतात, याचीही उत्सुकता आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) दोन उमेदवार गेल्या चोवीस तासांपासून बेपत्ता असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या उमेदवारांचा कुटुंबीयांशी तसेच पक्षाशी कोणताही संपर्क होत नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवणारे राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी बेपत्ता झालेल्या उमेदवारांची नावे असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मनसे पदाधिकार्‍यांनी सांगितले. केडगाव परिसर हा निवडणूकदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर, निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण करण्यात आले असावे, असा गंभीर संशय वर्मा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हरकतींमुळे गोंधळ, उशिरापर्यंत सुनावणी
अर्ज छाननीनंतर अनेक उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात हरकती दाखल केल्या होत्या. अतिक्रमण, कर थकबाकी, शौचालय प्रमाणपत्र आदी कारणांवरून हरकती घेण्यात आल्या होत्या. प्रभाग 14 मध्ये सुजित मोहिते आणि दत्ता गाडळकर यांच्या उमेदवारीवर हरकती दाखल झाल्याने केडगाव येथील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर दिवसभर तणावाचे वातावरण होते. या हरकतींवर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. अखेर रात्री 12 वाजता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्व हरकती फेटाळून लावल्या.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...