अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 1 मधील निवडणूक अधिक तापत चालली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, धमकी व आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (11 जानेवारी) तक्रार दाखल केली आहे.
आरती किशोरकुमार हालदार (वय 52, रा. कौशल्यानगरी, पाईपलाईन रस्ता) यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, त्यांची मुलगी संस्कृती हालदार हिने अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच वार्डमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून दिपाली बारस्कर या निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तसेच अर्ज भरल्यानंतर दिपाली बारस्कर यांचे पती नितीन उर्फ बाळासाहेब बारस्कर याने वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत नितीन बारस्कर याने कोणतीही परवानगी न घेता वारंवार तक्रारदार यांच्या घरी येऊन फॉर्म भरू नका असे सांगितले. तसेच 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर नितीन याने तक्रारदार यांच्या घरी येऊन तुम्हाला सांगितल्यावरही फॉर्म का भरला? उमेदवारी माघे घ्या. मला बिनविरोध यायचे आहे. मी तुम्हाला पैसे देतो, असे म्हणत आर्थिक आमिष दाखवले. मात्र तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे घेण्यास नकार दिल्याने संशयिताने धाकदपटशा व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांन नितीन बारस्कर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.




