Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC : महापौरपदी गाडे, उपमहापौरपदी जाधव बिनविरोध

AMC : महापौरपदी गाडे, उपमहापौरपदी जाधव बिनविरोध

औपचारिक घोषणाच बाकी || दोन्ही पदासाठी एक-एक अर्जच दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (2 फेब्रुवारी) शेवटचा दिवस होता. या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे महापौरपदासाठी ज्योती अमोल गाडे, तर भाजपकडून उपमहापौरपदासाठी धनंजय कृष्णा जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ज्योती गाडे आणि धनंजय जाधव यांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले असून, आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे.

- Advertisement -

दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज महापालिकेचे नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे सुपूर्द केले. महापौरपदाच्या उमेदवार ज्योती गाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून गणेश भोसले, तर अनुमोदक म्हणून अविनाश घुले यांनी स्वाक्षरी केली आहे. उपमहापौरपदाचे उमेदवार धनंजय जाधव यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि अनुमोदक म्हणून नगरसेवक निखिल वारे यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी माजी महापौर वाकळे, माजी उपमहापौर भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक वारे, विपुल शेटीया, पुष्कर कुलकर्णी यांच्यासह नगरसेविका पुष्पा बोरूडे, संध्या पवार, गीतांजली काळे, शारदा ढवण, तसेच सतीश शिंदे, जय भोसले, करण कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी बोलताना ज्योती गाडे म्हणाल्या, अहिल्यानगर असे नाव बदलल्यानंतर शहराच्या पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानासोबतच मोठी जबाबदारी आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आणि वारसा अखंड ठेवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करीन. स्व. वडील शिवाजीराव कर्डिले आज हयात असते तर त्यांना याचा निश्चितच अभिमान वाटला असता. त्यांचा विचार आणि वारसा पुढे नेण्यासाठी मी कटिबध्द आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न करीन, असे त्यांनी सांगितले.

उपमहापौरपदाचे उमेदवार धनंजय जाधव म्हणाले, केंद्र, राज्य आणि महापालिका या तिन्ही स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीचे सत्ताधारी समीकरण आहे. या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत नगरकरांना दर्जेदार आणि पारदर्शक सेवा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. मूलभूत सुविधांपासून ते विकासाच्या योजनांपर्यंत सर्व कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

सभेत होणार घोषणा
6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेत होणार्‍या विशेष सभेत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दाखल अर्जाची छाननी व माघारी व नंतर निवड अशी ही प्रक्रिया असली तरी महापौर व उपमहापौर पदासाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने केवळ औपचारिक घोषणाच बाकी राहिले आहे. त्यामुळे नामांतरानंतर अहिल्यानगरच्या पहिल्या महापौर होण्याचा मान ज्योती गाडे यांना तर उपमहापौरपदाचा मान धनंजय जाधव यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

नव-नियुक्त महापौर ज्योती गाडे या दिवंगत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या असून त्यांनी सावेडीतील प्रभाग क्रमांक 3 (सर्वसाधारण महिला- राखीव) जागेवरून सुमारे साडेचार हजार मतांनी विजय मिळविला आहे. उपमहापौर धनंजय जाधव हे माजी उपनगराध्यक्ष दिवंगत कृष्णा जाधव यांचे चिरंजीव असून, साईव्दारका ट्रस्टचे प्रमुख आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 5 (नागरिकांचा मागास प्रवर्ग- राखीव) येथून सुमारे साडेसात हजार मतांनी विजय संपादन केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वपक्षीय शोकसभेत अनेकांचा दाटून आला कंठ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा पूर्ण राज्यावर ठसा उमटला. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही राज्य सावरलेला नाही. सत्तेत राहिलेले व सत्तेच्या बाहेर...