Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : मनपाच्या वैद्यकीय अधिकार्‍याला माजी नगरसेवकाकडून दमबाजी

Ahilyanagar : मनपाच्या वैद्यकीय अधिकार्‍याला माजी नगरसेवकाकडून दमबाजी

महावितरणच्या अभियंत्याला माजी नगरसेवकाकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबुराव राजुरकर (वय 50, रा. चाणक्य चौक, बुरूडगाव रस्ता) यांना त्यांच्या कर्तव्यावर असताना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे (रा. माळीवाडा, अहिल्यानगर) याने दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डॉ. राजुरकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही घटना गुरूवारी (17 जुलै) सायंकाळी घडली. तक्रारदार डॉ. राजुरकर हे जुन्या कोर्टाजवळ मनपाच्या आरोग्य विभागाच्या कामावर असताना, बाळासाहेब बोराट हा एक व्यक्तीला सोबत घेऊन घटनास्थळी आला. त्यांनी संबंधित व्यक्तीच्या आजीच्या मृत्यूच्या नोंदीबाबत चर्चा करताना डॉ. राजुरकर यांना ‘तुम्ही कामच करत नाही, तुम्ही नोकर आहात हे विसरू नका’, अशा शब्दांत दमबाजी केली. डॉ. राजुरकर यांनी बोराटेला प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीची माहिती देऊनही त्याने संतप्त होत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

YouTube video player

या प्रकारामुळे डॉ. राजुरकरांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने मनपा प्रभाग कार्यालय बंद ठेवण्यात येणार असून सकाळी 10:30 वाजता मुख्य प्रशासकीय इमारत येथे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सचिव आनंद वायकर यांनी केले आहे.

महावितरणच्या अभियंत्याला माजी नगरसेवकाकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केडगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता राहुल सिताराम शिलावंत (वय 35 रा. शाहुनगर, केडगाव) यांच्या अंगावर माजी नगरसेवक मनोज कोतकर याने वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात शिलावंत यांनी फिर्याद दिली असून मनोज कोतकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राहुल शिलावंत हे महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (16 जुलै) सायंकाळी ते त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना, मनोज कोतकर याने त्यांना फोन करून खंडोबा मंदिर परिसरातील विद्युत वितरण बॉक्सच्या बसवणीबाबत विचारणा केली. शिलावंत यांनी योग्य त्या स्वरूपात उत्तर दिले असतानाही, कोतकर याने रागाच्या भरात फोनवरूनच शिवीगाळ सुरू केली आणि ऑफिसमध्ये थांब, मी येतो असे धमकीवजा बोलून फोन कट केला. सुमारे दहा मिनिटांतच मनोज कोतकर हा पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा वाहनातून आला आणि वाहन भरधाव वेगात चालवत शिलावंत यांच्यावर चढवण्याचा प्रयत्न केला.

त्यांचे सहकारी वैभव निकम व पोपट सातपुते यांनी त्यांना वेळीच बाजूला ओढून वाचवले. त्यानंतर कोतकर याने वाहनातून उतरून शिलावंत यांना जातीवाचक अपशब्द वापरून अपमानित केले व धमकी दिली. या संपूर्ण घटनेनंतर शिलावंत यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनाक्रम सांगितला आणि दुसर्‍या दिवशी गुरूवारी (17 जुलै) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...