अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टोविंग व क्लॅम्पिंग कारवाईसाठी नव्याने दर निश्चित करण्यात आले असून या दरानुसारच दंड आकारणी करण्याच्या सूचना ठेकेदार संस्थेला करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महासभेने शहरात ‘पे अँड पार्क’ व ‘नो पार्किंग’ झोनमध्ये कारवाईसाठी धोरण निश्चित करून कारवाईचे दर व पार्किंग शुल्क निश्चित केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन एका संस्थेला हे काम देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून टप्प्याटप्प्याने पे अँड पार्कची व नो पार्किंग झोनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही निश्चित केलेल्या सर्व भागात अंमलबजावणी झालेली नाही. नो पार्किंगमधील वाहनांवर ठेकेदार संस्थेकडून कारवाई होत असताना दंडाच्या रकमेबाबत तक्रारी होत आहेत.
नागरिकांकडूनही दंडाची रक्कम कमी करण्यासाठी मागणी होत आहे. सदरचे दर हे तत्कालीन महासभेने निश्चित केले होते. त्यात आता स्थायी समितीने फेरबदल करून दर काही प्रमाणात कमी केले आहेत.
असे आहेत नवे दर
नव्या दरानुसार दुचाकी वाहनावर टोविंग कारवाईसाठी 500 रूपये, क्लॅम्पिंग कारवाईसाठी 300 रूपये, चारचाकी वाहनाच्या टोविंग कारवाईसाठी 800 रूपये, क्लॅम्पिंग कारवाईसाठी 400 रूपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासह जीएसटी करही या रकमेवर आकारण्यात येणार आहे. पे अँड पार्क व नो पार्किंग झोन हे शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डांगे यांनी केले आहे.





