अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दोन वर्षांच्या प्रशासकीय काळातील अस्वस्थता संपवून अखेर नगर महापालिकेचे 68 कारभारी नगरसेवक निवडले गेले आहेत. आता निवडून आलेल्यांपैकी महापौर कोण होणार याकडे सर्वाचे लागले आहे. दरम्यान, महापौर पदाचे आरक्षण अजून राज्य सरकारने निश्चित केलेले नाही. ही परिस्थिती नगरच नव्हे, तर राज्यभरातील अन्य 28 महापालिकांची आहे. आगामी आठवड्यात याची महापौर पद आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहिल्यानगर मनपात राष्ट्रवादी अजित पवार गट 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौर पदावर त्यांचा प्रबळ दावा असला तरी आधी आरक्षण त्यानंतरच उमेदवाराची घोषणा अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे.
अहिल्यानगर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीने 27 व भाजपने 25 जागा जिंकून या युतीने वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी आता नगरसेवकांच्या खरेदी-विक्रीचा घोडेबाजार होण्याची शक्यता कमी आहे. महापौरपदी युतीचा नगरसेवक बसेल असे या दोन्ही पक्षांकडून सांगितले जात असले तरी या दोन्हींमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या असल्याने पहिल्या टर्ममध्ये त्यांचा अधिकार असणार आहे व दुसर्या टर्ममध्ये भाजपला संधी मिळू शकते.
मात्र, या विषयावर भाजपच्या गोटात सध्या मौन आहे. दरम्यान, महापौर पदाचे आरक्षण नेमके कोणते पडते व त्यासाठी समर्थ उमेदवार कोणाकडे आहे, यावर महापौरपद ठरणार आहे. असे असले तरी ज्यांचा महापौर होईल, त्याच्या मित्र पक्षाला उपमहापौरपद व स्थायी समिती अशी दोन महत्त्वाची पदे तर सत्ताधारी पक्षाला महिला व बालकल्याण समिती व सभागृह नेतेपद मिळू शकते. याची आडाखे बांधणी दोन्ही पक्षांतून सुरू आहे.
फक्त घोडे अडले आहे ते महापौरपदाचे आरक्षण कोणते पडते, या मुद्यावर. शासनाने महापालिका प्रशासनाकडून महापौर पदाबाबतची माहिती मागविली होती व ती पाठवली गेली आहे. यापूर्वी कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सोडण्यात आले होते. त्यासंबंधीची ही माहिती आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
2003 पासूनची स्थिती
महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी 2003 मध्ये महापौर पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले होते. त्यावेळी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना प्रथम महापौरपदाचा मान मिळाला होता. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 2006 मध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण होते आणि काँग्रेसचे संदीप कोतकर महापौर झाले. 2008 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आणि संग्राम जगताप पहिल्यांदा महापौर झाले. त्यानंतर 2010 मध्ये महिला राखीव जागेवर शिलाताई शिंदे महापौर झाल्या. 2013 च्या निवडणुकीनंतर संग्राम जगताप दुसर्यांदा महापौर खुला प्रवर्गातून झाले. त्यानंतर वर्षभरात 2014 मध्ये ते नगर शहराचे पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांनी महापौरपद सोडले ते अभिषेक कळमकर यांना दिले गेले. त्यानंतर 2016 च्या टर्ममध्ये महिला राखीव मध्ये सुरेखा कदम महापौर झाल्या. 2018 च्या निवडणुकीनंतर भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे खुल्या प्रवर्गातून या पदावर बसले. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2021 च्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राखीव जागेवर रोहिणी शेंडगे या महापौर झाल्या. आता 2026 मध्ये महापौरपदाचे आरक्षण काय पडते, याकडे लक्ष लागले आहे.




