अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरविकास विभागाने बुधवारी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर आता गुरूवारी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली असून, समितीकडून कामकाज सुरू झाले आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 15 जुलैला प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीत उपायुक्त, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक, नगररचनाकार, संगणक तज्ज्ञ, जनगणना अधिकारी व नगररचना कर्मचारी आदींचा समावेश आहे. गुरूवारी समितीकडून प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जनगणनेचे प्रगणक गट, संगणकावर नकाशे तयार करणे, प्रभागांच्या हद्दी तपासून निश्चित करून प्रभागाच्या व्याप्तीसह सुमारे 24 दिवसात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे.
निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार 4 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. 15 जुलैला प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द झाल्यावर त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यावर जिल्हाधिकार्यांमार्फत सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना मंजुरीसाठी पुन्हा आयोगाकडे सादर होईल व आयोगाच्या मान्यतेनुसार 1 सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.




