अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्याआधी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 29, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची मुदत देण्यात आली असली तरी पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे आज, सोमवार (2 फेब्रुवारी) हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून, सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव असून, सत्ताधारी युतीनुसार हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल होताच महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीचे राजकीय चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने निवडणूक लढवली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 27, भाजपला 25 अशा एकूण 52 जागा युतीकडे आल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गट नोंदणी केली असून, सत्ता वाटपाबाबत सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत. महापौर पदासाठी आज एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास 6 फेब्रुवारीच्या विशेष सभेत मतदानाव्दारे निवड केली जाणार आहे. मात्र, जर दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध होऊन त्याची औपचारिक घोषणा 6 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर शहराला पहिली महिला महापौर कोण मिळणार, यावर शिक्कामोर्तब होणार असून शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे राज्यभर तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत अहिल्यानगर महापालिकेत महापौर पद राष्ट्रवादीकडेच गेले पाहिजे, अन्यथा राज्यात चुकीचा राजकीय संदेश जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महापौर राष्ट्रवादीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादीकडे महापौर पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यात नगरसेविका ज्योती गाडे व संध्या पवार यांची नावे आघाडीवर असून, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे, मनिषा बारस्कर, सुनीता फुलसौंदर व आशा डागवाले यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. आज अर्ज दाखल होताच कोणाच्या नावावर अंतिम शिक्का बसतो, हे स्पष्ट होणार आहे.
महापौर पद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर उपमहापौर पद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची समितीही भाजपच्या वाट्याला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्येही उपमहापौर पदासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. विखे परिवाराच्या विश्वासातील नगरसेवक निखिल वारे तसेच अॅड. धनंजय जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा असून, अखेर विखे पाटील कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, आजचा दिवस अहिल्यानगरच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असून, महापालिकेच्या सत्तेचा चेहरा आणि शहराच्या पहिल्या महिला महापौराचे नाव लवकरच समोर येणार आहे.




