शिर्डी । प्रतिनिधी
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे शिर्डी येथे आगमन झाले. या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज सकाळी अमित शाह यांनी साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकला आणि आशीर्वाद घेतले. शाह यांच्या शिर्डी भेटीच्या वेळी राज्याचे प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. त्यांच्यासोबतच राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते.
साईबाबांच्या दर्शनाच्या निमित्ताने झालेले हे महत्त्वाचे राजकीय एकत्रित दर्शन अनेक चर्चांना वाव देत आहे. हा दौरा आणि सोबत असलेले वरिष्ठ नेते आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.




