मुंबई । Mumbai
येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे पट्ट्यात ‘दुबार मतदाना’चा (Duplicate Voting) मुद्दा कळीचा ठरत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. दुबार मतदान करणाऱ्यांना त्यांनी थेट ‘फोडण्याचा’ इशारा दिला असून, यामुळे निवडणुकीपूर्वीच राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरे यांनी दुबार मतदारांविरुद्ध संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “जर कुणी अनधिकृतपणे तुमच्या-आमच्यासोबत रांगेत उभं राहून दुबार मतदान करणार असेल, तर मग सर्वसामान्य मतदारांच्या हक्काची काय किंमत उरली? बाहेरच्या राज्यातून माणसे आणून जर ती आपल्याला सांगणार असतील की आपल्यावर कोण राज्य करणार, तर ते आम्ही खपवून घेणार नाही.”
अमित ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, “लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे ४० लाख दुबार मतदार घुसवले गेले आहेत. असा प्रकार समोर आला, तर आम्ही त्यांना तिथेच फोडणार.” त्यांच्या या विधानामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे.
शिवाजी पार्कवर झालेल्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनीही दुबार मतदारांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “सकाळी ६ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर तैनात राहा. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीवर बारीक लक्ष ठेवा. एखादा दुबार मतदार मतदान करायला आला, तर त्याला तिथेच थोबडवा आणि फोडून काढा.” ठाण्यातील सभेतही त्यांनी हीच भूमिका कायम ठेवत कार्यकर्त्यांना ‘बेसावध’ न राहण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही दुबार मतदारांना रोखण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या ‘बीएलओ’ला (Booth Level Officers) त्यांनी सांगितले आहे की, जर मतदार यादीत लाल निशाण असलेला किंवा संशयास्पद दुबार मतदार आढळला, तर लगेच ‘गोंद्या आला रे आला’ असा मेसेज कार्यकर्त्यांना द्यावा. “दुबार मतदार दोन पायांवर चालत केंद्रात येईल, पण परत जाताना मात्र तो स्ट्रेचरवरूनच जाईल,” असा टोकाचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दुबार मतदानाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदानाची शक्यता तपासून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, केवळ तक्रारींवर अवलंबून न राहता, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर उतरून दुबार मतदारांचा ‘बंदोबस्त’ करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना, राज आणि अमित ठाकरे यांच्या या आक्रमक इशाऱ्यांमुळे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.




