Saturday, May 2, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "मुख्यमंत्र्यांना इतके हिंदीचे प्रेम असेल तर त्यांनी…"; संजय राऊतांचा...

Sanjay Raut : “मुख्यमंत्र्यांना इतके हिंदीचे प्रेम असेल तर त्यांनी…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

शिवेसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर तिखट शब्दांत टीका केली आहे. “महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील,” असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे असल्याचा आरोप करत, भाजप राज्यावर हिंदी भाषा लादण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आणि वसई-विरारमधील राजकीय वातावरण या विधानांमुळे चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी भाजपच्या नवी मुंबईतील जाहीरनाम्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “कालपर्यंत मुख्यमंत्री मराठीचा पुळका असल्याचे सांगत होते, मात्र नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपने हिंदी सक्तीची करण्याचे आश्वासन दिले आहे. नवी मुंबई हे शहर मराठी, आगरी आणि कोळी बांधवांनी वसलेले आहे. येथील स्थानिक लोक मराठी असताना हिंदीची सक्ती कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, स्थानिक नेत्यांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि प्रशांत ठाकूर हे त्या भागातील असले तरी, भाजप तिथे बाहेरून आलेल्या लोकांसाठी मराठी अस्मितेशी तडजोड करत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हिंदी भाषेशी असलेल्या ‘प्रेमा’वर टिप्पणी करताना राऊत म्हणाले की, “जर मुख्यमंत्र्यांना हिंदीचे इतकेच प्रेम असेल, तर त्यांनी उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी. पंतप्रधान मोदी त्यांना लडाख किंवा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री करू शकतात, पण महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे.” काही दिवसांपूर्वी वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या हिंदीतील भाषणाबद्दलही राऊतांनी संताप व्यक्त केला. “वसई-विरार हा चिमाजी आप्पांचा आणि पेशव्यांचा पराक्रम असलेला मराठी भाग आहे. तिथे जाऊन मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात आणि त्या भागाची भाषा हिंदी असल्याचे भासवतात, हे दुर्दैवी आहे. हा सर्व प्रकार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या मोठ्या कारस्थानाचा भाग आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. “अण्णामलाई म्हणतात की त्यांच्या तोंडावर ‘बॉम्बे’ बसले आहे. जर त्यांना इतकीच अडचण असेल तर त्यांनी खुशाल चेन्नईला जावे. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या भावनांशी खेळण्याचे धाडस करू नये,” अशा कडक शब्दांत त्यांनी अण्णामलाईंना सुनावले. राज्याचे मुख्यमंत्री अशा बाहेरील नेत्यांच्या विधानांना मूकसंमती देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून,अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू...