Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखअमृताची कणसे पेरीत जावी!

अमृताची कणसे पेरीत जावी!

सर्व धर्मातील संतांनी मानवतेचा पुरस्कार केला. तो आचरणात कसा आणावा याचे मार्गही आखून दिले. संत गाडगेबाबांनी मानवता धर्माचा मार्ग प्रशस्त केला. कवी आणि गीतकारांनीही त्यांच्या काव्यातून अखंड मानवतेचाच पुरस्कार केला. कवी अनिल एका कवितेत म्हणतात,
‘अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यांत दु:खितांच्या वेदनांच्या कळा आमच्याही उरांत’ तर ‘बस यही अपराध मैं हरबार करता हूॅ.. आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ… ही भावना गीतकार नीरज व्यक्त करतात. अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आणि व्यक्ती समूह मानव धर्माचा पाईक व्हायचा प्रयत्न करतात. समाजाच्या भल्यासाठी झटतात. अशा प्रयत्नांची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे हे माध्यमांचे देखील कर्तव्य आहे. मकर सक्रांतीचा सण सर्वांनीच उत्साहाने साजरा केला. यानिमित्त होणार्‍या पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करु नये असे आवाहन सामाजिक संस्थांनी केले होते. तरीही थोड्याफार प्रमाणात त्याचा वापर झालाच. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नाशिक परिसरातील अनेक पक्षीमित्रांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी आपले संपर्क क्रमांक देखील जाहीर केले होते. भाईंदर येथील जैन अ‍ॅलर्ट नावाच्या तरुणांच्या समुहाने त्यासाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. पक्षांवर उपचारासाठी वैद्यकीय मदत देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारले जातात. खाद्य ठेवले जाते. पण अनेक संस्था पशूपक्षांसाठी कायमस्वरुपी पाणवठे बांधतात. दौंड तालुक्यातील वरवंड गावातील एका शिक्षकाने पाणवठ्याशी वडिलांच्या स्मृतींचे नाते जोडले. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पशूपक्षांसाठी कायमस्वरुपी पाणवठा बांधून दिला. अनेक सामाजिक संस्था अपंगत्व आलेल्या माणसांना उभारी देण्यासाठी काम करतात. नाशिकमध्ये श्री.शाम सेवक मंडळ ट्रस्टचा वार्षिक महोत्सव नुकताच पार पडला. यानिमित्त गरजूंना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. याच कार्यक्रमात काही जोडप्यांचा सामुदायिक विवाह देखील पार पडला. अशा विविध पद्धतीने माणसे आणि संस्था सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात. काही जण अवयवदानाचा मार्ग स्वीकारतात. काही कारणास्तव काही रुग्णांचा मेंदू मृत होतो. अशा रुग्णांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांचे नातेवाईक घेतात. त्यांचा तो निर्णय गरजूंसाठी जीवनदानच ठरतो. गेल्या वर्षी 120 पेक्षा जास्त मेंदूमृत झालेल्या रुग्णांचे अवयव दान करण्यात आले. त्या निर्णयाने अनेक गरजू रुग्णांच्या आयुष्यात पहाट फुलवली. या सर्व संस्थांनी आणि व्यक्तींनी मानवता धर्माचे आचरण करुन समाजासमोर आदर्श ठेवला. ही प्रवृत्ती वाढीस लागायला हवी. सर्व समाजघटकांनी या प्रवृत्तीचे अनुकरण केले तर माणसेच एकमेकांचे पाठबळ बनतील. अन्यथा, क्षुल्लक कामांसाठी सुद्धा सरकारवर अवलंबून राहाण्याचा वृत्ती बळावते आहे. माणसे प्रसंगी सगळी गैरसोय सहन करतात, पण त्यांच्यासाठी सरकारनेच सुविधा पुरवाव्यात असा त्यांचा अट्टाहास असतो. मानवता धर्माचा पुरस्कार करणारांची संख्या वाढत गेली तर प्रसंगी गैरसोय सहन करुन सुद्धा सरकारवर अवलंबून राहाण्याच्या वृत्तीलाही काहीसा अटकाव बसू शकेल. मानवी मूल्यांचाही पुरस्कार होऊ शकेल. अशा माणसांचे वर्णन कवी धनाजी धोंडीराम घोरपडे ‘अमृताची कणसे’ असा करतात. समाजातील अमृताच्या कणसांची संख्या वाढत जावी  हीच अपेक्षा. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या